आयुक्तांना निनावी फोन आला आणि आदेश जारी झाला
पुणे : ईगल आय मीडिया
विक्रीकर आयुक्तांना ट्रकमधून कर चुकवून वाहतूक होत असल्याचा निनावी फोन आला. त्यानंतर लगेच आयुक्तांनी आदेश काढून विक्रीकर अधिकाऱ्यांना टोलनाक्यावर तैनात करून ट्रक ची तपासणी करावी असे फर्मान सोडले आहे.
सरकारी खात्यात आले अधिकाऱ्यांच्या मना तेथे मंत्र्यांचेही चालेना अशी स्थिती असते. पण ते खातं जर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारख्या कडक शिस्तीच्या मंत्र्याच्या अखत्यारीत असल्यावर आपली अधिकार गाजविण्याची भूक अधिकारी येनकेनप्रकारे भागवून घेतातच. असाच काहीसा प्रकार राज्याच्या अर्थखात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या विक्रीकर व जीएसटी खात्यामध्ये झाला आहे.
काही वाहतूकदार राज्यात कर चुकवून वाहतूक करीत असल्याची माहिती देणारा एक निनावी फोन राज्याचे विक्रिकर आयुक्त राजीव मित्तल यांना आला. या फोननंतर मित्तल यांनी तातडीने विक्रिकर खात्यातील प्रत्येक अधिकाऱ्याला टोलनाक्यांवर ट्रक तपासण्याचे फर्मान सोडले.हे अधिकारी रात्री २ ते सकाळी आठ वाजेपर्यंत टोल नाक्यांवर ट्रक तपासणार आहेत.
वरवर हा कर्तव्यदक्षतेचा प्रकार वाटत असला तरी प्रत्यक्षात या एकंदर द्राविडी प्राणायामातून नेमकं काय साध्य होणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे.शिवाय ट्रकांची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबतही कोणतीही स्पष्ट सुचना या आदेशात नाही. नियमानुसार अशा प्रकारची तपासणी करीत असताना अधिकाऱ्यांना हत्यारी पोलीसांची सुरक्षा पुरविणे अपेक्षित आहे. परंतु आयुक्तांनी काढलेल्या आदेशात अशा प्रकारची कोणतीही सुविधा पुरविण्याबाबत कसलेही भाष्य करण्यात आले नाही.
कोरोनाच्या स्थितीचाही या आदेशात विचार करण्यात आला नाही. सतत वाहतूक करणारे ट्रक ड्रायव्हर व क्लीनर्स हे कोरोना विषाणूचे सुपर स्प्रेडर असू शकतात. त्यांची तपासणी करण्याचे आदेश देताना या खात्यातील कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना कोरोनामुळे मृत्यु आल्यास फ्रंटलाईन वर्करचा दर्जा नसल्यामुळे इतर कोणतीही सुविधा मिळणार नाही.
त्यामुळे आय़ुक्तांच्या या नव्या फर्मानामुळे कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घातला जात असल्याचा सूर विक्रीकर व जीएसटी खात्यातून ऐकायला मिळत आहे. याबाबत आयुक्तांच्या कार्यालयास वारंवार फोन करुन त्याची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते मिटींगमध्ये आहेत असे उत्तर देण्यात आले.