अवताडे यांनी फेसबुक पोस्ट करून पक्षाचे आभार मानले.
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकित अखेरीस भारतीय जनता पक्षाने दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान अवताडे यांच्यावर विश्वास टाकला असून त्यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली आहे. स्वतः समाधान अवताडे यांनीच फेसबुकवर पोस्ट करून माहिती दिली आहे. त्याचबरोबर पक्षाचे आभार मानले आहेत.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी भगीरथ भालके यांना निश्चित झाली आहे, त्यांनी प्रचाराला सुरुवात ही केली आहे. मात्र भाजपची उमेदवारी कुणाला मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
विधानपरिषद सदस्य प्रशांत परिचारक आणि समाधान अवताडे यांची नावे चर्चेत होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असताना अजूनही नाव जाहीर होत नसल्याने मतदारसंघात उत्सुकता वाढीस लागली होती.
आज समाधान अवताडे यांनी फेसबुकवर पोस्ट करून भाजपचे आभार मानले आहेत. त्यामुळे पोटनिवडणूकीत भाजपचे उमेदवार समाधान अवताडे निश्चित झाले आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस कडून अधिकृत नावाची घोषणा बाकी आहे. आज रात्री किंवा उद्या या पक्षाकडून नावाची घोषणा होण्याची अपेक्षा आहे.