मुंबई-नागपूर प्रवासासाठी १,१५७ रुपये टोल
टीम : ईगल आय मीडिया
मुंबई – नागपूर या समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असून हा महामार्ग डिसेंम्बर अखेर सुरू होणार आहे. मात्र या महामार्गावर प्रवास करताना वाहन धारकांचे डोळे पांढरे होणार आहेत. प्रति किलोमीटर 1.65 रुपये टोल फी मोजावी लागणार असून नागपूर हुन मुंबईला जाणाऱ्या प्रत्येक छोट्या वाहनास किमान 1157 रुपये मोजावे लागणार आहेत.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पातील नागपूर ते शिर्डी हा ५२० किमी लांबीचा मार्ग डिसेंबर २०२१ पासून वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे, तर पुढील वर्षी ७०० किमीचा संपूर्ण मार्ग वाहतुकीस खुला होणार आहे. मात्र या मार्गाचा वापर करण्यासाठी वाहनचालक वा प्रवाशांना टोलपोटी १ रुपया ६५ पैसे प्रति किमी दराने शुल्क भरावे लागणार आहे. हा टोलचा दर लक्षात घेता मुंबईहून नागपूरला जाण्यासाठी ७०० किमीच्या एकेरी प्रवासासाठी १,१५७ रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबई ते नागपूर रस्ते प्रवासासाठी १५ ते १६ तासांचा कालावधी लागतो.
समृद्धी महामार्गासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार १ रुपया ६५ पैसे प्रति किमी दराने टोल आकारणी केली जाणार असल्याची माहिती ‘एम.एस.आर.डी.सी.’चे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली. केंद्राच्या २००८ च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार टोल आकारणी करताना मुंबई ते नागपूर एकेरी प्रवासासाठी साधारणत: १,१५७ रुपये टोल द्यावा लागेल, अशी माहिती ‘एम.एस.आर.डी.सी.’चे सह व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.
मुंबईहून नागपूरला आठ तासांत पोहोचता यावे यासाठी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाची बांधणी करण्यात येत आहे. या प्रकल्पातील नागपूर ते शिर्डी टप्पा पूर्णत्वाच्या मार्गावर असून डिसेंबरअखेरीस हा टप्पा वाहतुकीत समाविष्ट होणार आहे. या मार्गावरून प्रवास करण्यासाठी किती टोल द्यावा लागेल, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात होता. अखेर ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणा’ने टोलचे दर जाहीर केले आहेत.