पंढरीत साने गुरुजींच्या स्मारकाचे लोकार्पण : वै. तनपुरे महाराजांचा ३७ वा पुण्यतिथी सोहळा संपन्न
पंढरपूर : ईगल आय न्यूज
देश स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला कष्टकऱ्यांचा देव असलेल्या पांडुरंगाच्या मंदिरात दलितांना प्रवेश नव्हता, यासाठी साने गुरुजींनी दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन उभा केले. सनातनी व्यवस्थेविरुद्ध मजबुतीने उभा राहिले. पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकर्यांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी चळवळ उभा केली, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केले. येथील संत तनपुरे महाराज मठात उभा करण्यात आलेल्या साने गुरुजी स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी ते ऑनलाईन च्या माध्यमातून बोलत होते.
यावेळी मंचावर हभप बद्रीनाथ तनपुरे महाराज, आ. बबनराव शिंदे, पन्नालाल सुराणा, माधव कारंडे, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, उपेंद्र टण्णू, हभप भारत रामदास जाधव, हभप ज्ञानेश्वर बंडगर आदी सह मोठया संख्येने राष्ट्र सेवा दल सैनिक, छात्रभारती, वारकरी मंडळी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना खा. पवार म्हणाले कि, तो काळ देशाला स्वातंत्र्य मिळवण्याचा काळ होता, अशा काळात विठ्ठल हा कष्टकऱ्यांचा देव असूनही त्यामध्ये लाखोंच्या संख्येने दर्शनासाठी येणाऱ्या दलितांना प्रवेश नव्हता, त्यामुळे साने गुरुजींनी त्यावेळच्या मुंबई सरकारकडे पत्र लिहून मागणी केली, तसेच विठ्ठल देवस्थानच्या त्यावेळच्या पंच कमिटीकडे पत्रे लिहून आवाहन केले होते कि, सर्व माणसे देवाचे लेकरे आहेत या लेकरांना मंदिरात प्रवेश मिळावा. यासाठी शेवटी साने गुरुजींनी १ मे ते १० मे या काळात पंढरपुरात उपोषण केले. सनातनी व्यवस्थेविरुद्ध ते मजबुतीने उभा राहिले आणि मंदिर खुले झाले. चळवळीचे ठिकाण असलेल्या संत तनपुरे मठात स्मारक होत असून हे स्मारक या चळवळीची महती सांगणारे ठरेल.
यावेळी हभप बद्रीनाथ तनपुरे म्हणाले कि, भाव तिथे देव आहे, मंदिरात देव आहेच, मात्र तो मंदिराच्या बाहेरही चराचरात आहे, तो सर्वांठायी आहे, यामध्ये समतेचा विचार असल्याचे संतांनी सांगितले. संत नामदेवांनी हाच समतेचा विचार आणि वारकरी संप्रदायाची चळवळ भारतभर पोहोचवली, ७५ वर्षांपूर्वी संत तनपुरे महाराजांनी बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा केली आणि भारत जोडो चळवळ त्याकाळी रुजवली. पंडित नेहरूंसमोर त्यावेळी देशातील कष्टकऱ्यांच्या भुकेचा प्रश्न निर्माण झालेला असताना तनपुरे महाराजांनी संत गाडगेबाबांच्या आदेशाने पंढरपूरमध्ये अन्नदान चळवळ सुरु केली. पुढे समतेचा हा विचार समोर ठेऊन साने गुरुजींच्या आंदोलनासाठी मठात जागा दिली. आणि ते ऐतिहासिक आंदोलन झाले, वारकरी संप्रदाय हा पुरोगामी चळवळ आहे.
यावेळी आ. बबनदादा शिंदे म्हणाले कि, त्याकाळी विठ्ठल मंदिरात विशिष्ट लोकांनाच प्रवेश होता, अशा कठीण काळात तनपुरे महाराजांनी अन्नदान चळवळ सुरु केली, आणि साने गुरुजींनी विठ्ठल मंदिर खुले केले. याया घटना महाराष्ट्रातील सामाजिक चळवळी आहेत.
यावेळी श्रीची विठ्ठल सहकाराचे अध्यक्ष अभिजित पाटील, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, यांनीही मनोगते व्यक्त केली.
मान्यवरांचे स्वागत हभप अनंत बद्रीनाथ तनपुरे यांनी केले तर प्रास्ताविक स्मारक समितीचे प्रमुख राजाभाऊ आवसक यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निशिकांत परचंडराव, श्रीरंग गायकवाड, दादासो रोंगे,अशोक क्षीरसागर, शिवाजी शिंदे ,नागेश आवताडे, महादेव (तात्या) कोळी, पत्रकार शिवाजी शिंदे, सारंग कोळी, मल्हारी पवार, डॉ. अनिल जोशी, श्री. कपिल डिंगरे, प्रकाश पोळ, दत्ता कोंडलकर, आणि अॅड. दत्ता तोडकरी यांनी परिश्रम घेतले.
ReplyReply allForward |