संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचा आर्थिक पाठिंबा

भगीरथ भालके यांना एक दिवसाचा पगार मदतनिधी


मंगळवेढा : प्रतिनिधी

निवडणूक ही समविचारी लोकांनी समजून घेतली असून कारखान्याच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची आहे. या कारखान्यात असलेला कर्मचारी हा गेल्या काळात दबलेल्या भूमिकेत होता. लोकशाही दिसत नव्हती, तीच अवस्था मतदारसंघात असून आता कारखाना निवडणुकीत जसे सभासदांनी परिवर्तन केले तेच चित्र विधानसभा निवडणुकीत दिसेल,असा विश्वास काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांनी व्यक्त केला.


महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांना गुरुवारी श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी कारखाना कार्यस्थळावर बोलावून त्यांचा एक दिवसाचा पगार निवडणुकीसाठी मदत निधी म्हणून त्यांच्याकडे सुपूर्द केला.

यावेळी भगीरथ भालके यांनी बोलताना सांगितले की, या चार वर्षात तालुक्यातील लोकांना वेगवेगळे अनुभव आले आहेत, एखादे विकासकाम कमी झाले तरी लोकांना त्रास होत नाही. पण जातीय तेढ व दबावतंत्राचा वापर मतदारांना अपेक्षित नाही. आपण जो तन मन धनाने आशीर्वाद दिला आहे त्याच्या उपकाराची परतफेड करणे अवघड आहे, मात्र मतदारसंघात एक लोकशाही वातावरण पूर्वीप्रमाणेच दिसेल व कारखान्याचे काम आणखी गतीने करण्यासाठी मी सहकार्य करेन असे सांगितले.


यावेळी व्हा चेअरमन तानाजी खरात, भारत बेदरे, बसवराज पाटील, मुरलीधर दत्तू, अर्जुन पाटील, मुरलीधर सरकळे, रविकिरण कोळेकर, सिद्धेश्वर धसाडे यांच्यासह दामाजी कारखान्याचे कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

error: Content is protected !!