करकम्ब, कासेगाव, भोसे, भाळवणी, खर्डी, वाखरी सह 94 गावच्या लोकांचे लक्ष्य
पंढरपूर : ईगल आय मीडिया
तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच पदाची आरक्षण सोडत आज ( दि. 27 रोजी ) काढण्यात येणार आहे. पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठ्या करकम्ब, भाळवणी, भोसे, वाखरी, कासेगाव, खर्डीसह सर्व 94 ग्रामपंचायतींचे सरपंच पदाची आरक्षण सोडत आज काढली जाणार असल्याने तालुक्याचे लक्ष्य आजच्या सोडतीकडे लागले आहे.
पंढरपूर तालुक्यातील 94 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत आज बुधवार ( दि.27 ) रोजी पंचायत समिती च्या शेतकी सभागृहात सकाळी 11 वाजता काढण्यात येणार आहे. नुकतेच तालुक्यातील 72 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत आणि अद्याप सरपंच निवड बाकी आहे.
राज्य सरकारने सरपंच निवडीचे धोरण बदलल्याने निवडणुकीनंतर सरपंच आरक्षण सोडत काढण्यात येत आहे. अनेक गावांत काठावरचे बहुमत आहे तर अनेकांकडे सरपंच पदाचा सदस्य नाही. त्यामुळे फोडाफोडीच्या राजकारणास जोर येण्याची शक्यता आहे. त्यातच सरपंच पदाचे आरक्षण काय निघते त्याकडे लक्ष ठेवून शेकडो ग्रामपंचायत सदस्य गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.
त्यामुळे आज आरक्षण सोडत काढल्यानंतर अनेकांच्या स्वप्नांना नवीन बहर येणार आहे तर अनेकांच्या स्वप्नांचा चुराडा होणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष उद्याच्या सरपंच पद आरक्षण सोडतीकडे लागले आहे.तसेच आरक्षण जाहीर झाल्यानंतर सदस्यांची पळवापळवी सुद्धा होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पॅनल प्रमुखांनी तयारी केली आहे.