23 फेब्रुवारी रोजी सरपंच निवडी

जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश

पंढरपूर : ईगल आय मीडिया

गेल्या 8 ते 10 दिवसांपासून रखडलेल्या 7 पैकी 6 तालुक्यातील सरपंच, उपसरपंच निवडीचा मुहूर्त निघाला असून 23 फेब्रुवारी रोजी सरपंच आणि उपसरपंच निवडीची सभा घेण्यात यावी असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज काढले आहेत. त्यामुळे येत्या 23 फेब्रुवारी ( मंगळवारी ) गावोगावी सरपंच, उपसरपंच पदाच्या गुलालाची उधळण होणार आहे.

पंढरपूर तालुक्यातील सरपंच निवडीबाबत सस्पेन्स कायम ,

पंढरपूर तालुक्यातील 74 ग्रामपंचायतीच्या निवडणूका झालेल्या आहेत, या सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडी चा कार्यक्रम ही रखडला आहे. आजच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात पंढरपूर तालुक्यातील निवडीबाबत उल्लेख नसल्याने तालुक्यातील निवडीबाबत सस्पेन्स कायम आहे.

जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील 654 ग्रामपंचायत च्या निवडणूका झाल्या, मात्र त्यानंतर न्यायालयीन अडथळ्यामुळे सरपंच, उपसरपंच निवडी रखडल्या आहेत. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून या निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी आज माळशिरस, मोहोळ, करमाळा,माढा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, या तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांना आदेश काढून 3 दिवस अगोदर ग्रामपंचायत सदस्यांना नोटीस काढण्याची सूचना केली आहे. तसेच 23 फेब्रुवारी रोजी सरपंच, उपसरपंच निवडीची पहिली सभा घेण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!