पाटण तालुक्यातील घटना : 50 लाखांचे नुकसान
टीम : ईगल आय मीडिया
माजगाव ( ता.पाटण,जि. सातारा) येथे पत्नीशी झालेल्या भांडणामुळं संतप्त पतीने स्वतःच्या घराला आग लावल्याची घटना घडली आहे. पण स्वतःच्या घराला आग लावल्यानंतर या आगीमुळं शेजाऱ्यांची 10 घरे जळून जवळपास 50 लाखांचे नुकसान झाले आहे. संजय रामचंद्र पाटील असे घरे पेटवणाऱ्या इसमाचे नाव आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवितहानी झाली नाहीये.
संजय पाटील याने स्वत:च्या राहत्या घराला आग लावली. त्यामध्ये घरातील दोन गॅस सिलिंडरने पेट घेतल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे शेजारील पांडुरंग महादेव पाटील, ज्ञानदेव महादेव पाटील, संभाजी गणपत पाटील, चंद्रकांत शिवाजी पाटील, भीमराव गणपती पाटील, दत्तात्रय मारुती पाटील, कृष्णात मारुती पाटील, पंढरीनाथ मारुती पाटील, गोरखनाथ मारुती पाटील व भाडेकरू आनंदराव तुकाराम पाटील यांच्या दहा घरांना भीषण आग लागली.
सदर व्यक्तीने स्वतःच्या घराला आग लावली तेव्हा घरातील सिलेंडरनेही पेट घेतला. सिलेंडरने पेट घेतल्यामुळं आगीचा एकच भडका उडाला व नंतर ही आग पसरत गेली व त्याचा फटका आजूबाजूच्या सुमारे दहा घरांना बसला आहे.
ही सर्व घरे आगीत खाक झाली असून सुमारे ५० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती संजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली आहे. तसंच, घरे पेटवून देणाऱ्या या इसमाला ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिल्याचीही चर्चा आहे.