नूतन सरपंचांना ग्रामपंचायत आवारात मारहाण

सय्यद वरवडे ( ता.मोहोळ ) येथील घटना

मोहोळ : ईगल आय मीडिया


ग्रामपंचायतीची मासिक सर्वसाधारण सभा घ्यायची नाही, असे म्हणून गाव गुंडांनी नूतन सरपंचास बेदम मारहाण केल्याची घटना आज ( बुधवारी ) सय्यद वरवडे ( ता. मोहोळ ) ग्रामपंचायत कार्यालयात घडली. वाल्मिकी जालिंदर निळे (रा. सय्यद वरवडे, ता. मोहोळ) असे जखमी सरपंचाचे नाव आहे. या प्रकरणी पाच जणां विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


राजेंद्र औदुंबर विरपे, अंकुश उर्फ भाऊ मारुती कदम, देविदास भिवा कदम, सोमनाथ विलास विरपे, बाळू भिवा कदम (सर्व रा. सय्यद वरवडे, ता. मोहोळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.


बुधवार (दि.१० मार्च ) रोजी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीच्या मासिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या मिटींगला जात असताना ग्रामपंचायत कार्यालयाच्या दरवाज्यात उभ्या असलेल्या गाव गुंडांनी “तू मीटिंग ला जायचे नाही” असे म्हणून सरपंच वाल्मिकी निळे यांना ओढून बेदम मारहाण केली. यावेळी शिवराज निळे हे सोडवायला आले असता, त्यांनाही मारहाण करण्यात आली आहे. यामुळे सय्यद वरवडे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.


याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सय्यद वरवडे ग्रामपंचायतीची सरपंच निवड २३ फेब्रुवारी रोजी पार पडली आहे. यात वाल्मिकी जालिंदर निळे यांची सरपंच तर पमाबाई शंकर कोरे यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे.


या मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी मोहोळ पोलिसात वरील पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!