राज्यातील शाळा लवकरच सुरू होणार

शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिली माहिती

टीम : ईगल आय मीडिया

राज्यातील कोरोनाचे प्रमाण नियंत्रणात येत असल्यामुळे ग्रामीण भागासोबतच नागरी भागात ही शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय येत्या आठवड्याभरात होण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

राज्यात सध्या कोरोनासंदर्भात स्थानिक परिस्थितीनुसार निर्बंध शिथिल किंवा कठोर स्वरूपात आहेत. रुग्णसंख्या कमी झालेल्या राज्याच्या ग्रामीण भागात आधीच शाळा सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली असून त्यासाठी कोरोनाची रुग्णसंख्या आणि इतर अटी घातलेल्या आहेत. आता त्यामध्ये अधिकच्या वर्गांचा समावेश देखील केला जाणार आहे.

१७ ऑगस्टपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा आम्ही विचार करत आहोत. त्यासंदर्भात कमिटीने सर्व एसओपी निश्चित केल्यानंतर त्याची माहिती दिली जाईल, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. आत्तापर्यंत करोना रुग्णसंख्या मर्यादित असलेल्या ग्रामीण भागातच शाळा सुरू असताना आता शहरी भागातही शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

“येत्या १७ ऑगस्टपासून राज्यातल्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत. रुग्णसंख्या कमी झाली आहे, अशा ठिकाणी ग्रामीण भागात ५वी ते ८वीच्या शाळा देखील सुरू करण्याचा विचार आहे. त्यासोबतच शहरी भागात महानगर पालिका, नगर पालिका आणि नगर पंचायत क्षेत्रातील ८वी ते १२ वीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या समितीप्रमाणेच शहरी भागांसाठीही समितीची नियुक्ती करण्यात येईल”, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. सध्या राज्यात ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी आहे, त्या ग्रामीण भागात ८ वी ते १२ वीच्या शाळा सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे. आता त्यामध्ये शहरी भागाचा देखील समावेश करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!