राज्यातील शाळा भरणार नाहीत

राज्य सरकारने अध्यादेश स्थगित केला

टीम : ईगल आय मीडिया

राज्यातील ज्या-ज्या भागांत कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे, त्या भागांतील शाळा सुरु करण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाकडून शाळा सुरू करण्याच्या संदर्भात अध्यादेश ही काढण्यात आला. मात्र आता या अध्यादेशाला राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आली असून टास्क फोर्स सोबतच्या झालेल्या बैठकीनंतर शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राज्य सरकारने जरी परवानगी दिली, तरी अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा स्थानिक प्रशासन, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त यांना देण्यात आला आहे, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने ही अनेक जिल्ह्यांत कोरोना निर्बंधात शिथिलता दिली होती. याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्याबाबत मोठा निर्णय घेतला होता. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने 10 ऑगस्ट रोजी शाळा सुरू करण्याच्या संदर्भात जीआर काढला होता. 17 ऑगस्टपासून ग्रामीण भागातील 5 ते 7 तर शहरी भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्यात येणार होते. मात्र दोन दिवसातच सरकारने निर्णय बदलल्यामुळे राज्य सरकारचा सावळा गोंधळ समोर आला आहे.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण देताना सांगितले की, मुलांची सुरक्षितता आणि आरोग्याला आमचं नेहमीच प्राधान्य राहिलेलं आहे. त्यानुसारच निर्णय घेणं हा टास्क फोर्स आणि सरकारचाही अजेंडा आहे. टास्क फोर्स आणि राज्य सरकार यांच्याकडून सुचवण्यात आलेल्या एसओपींचा अभ्यास केला जाईल. त्यासंदर्भात येत्या दोन-चार दिवसांमध्ये बैठक होईल आणि त्यामध्ये शाळांबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, आम्ही सरसकट कुणावरही शाळा सुरू करण्याची जबरदस्ती केलेली नाही. गेल्या वर्षभरात अनेक ठिकाणी वर्षभर शाळा सुरू झालेल्या नाहीत. कारण तिथल्या आयुक्तांना, जिल्हाधिकाऱ्यांना त्याचे अधिकार आहेत. त्यानुसार त्यांनी ते निर्णय घेतले. आत्तासुद्धा त्यांनाच अधिकार देण्यात आले आहेत”, असंही त्या म्हणाल्या.


कोरोना रुग्ण कमी होत असले तरीही प्रादुर्भाव अजुनही कायम आहे. यासोबतच कोरोनाची तिसरी लाट येण्याचीही शक्यता आहे. हे सर्व धोके लक्षात घेता शाळा तुर्तास सुरू करु नयेत असे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळेच टास्क फोर्सच्या बैठकीतही शाळा सुरू न करण्याची प्रतिक्रिया आली आणि त्यानंतर शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आहे. यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!