‘सिरम’ देणार मृतांच्या वारसांना आर्थिक मदत

सायरस पुनावाला यांची मोठी घोषणा

सायरस पुनावाला

टीम : ईगल आय मीडिया

पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट मधील निर्माणाधीन इमारतीत लागलेल्या आगीत पाच कंत्राटी मजुरांचा होरपळून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून या घटनेवर तीव्र शोक व्यक्त करत, सीरमचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सायरस पुनावाला यांनी मयत कामगारांच्या कुटुंबाला प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत देण्याचं जाहिर केलं आहे.

सीरमचे सायरस एस. पुनावाला यांनी एक निवेदन जारी करून या संपूर्ण घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला आहे. सीरमसाठी आजचा दिवस अत्यंत वेदनादायी आहे. आमच्या नवीन निर्माणाधीन इमारतीत लागलेल्या आगीत पाच जणांना जीव गमवावा लागला आहे. या सर्वांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, अशा शोकभावना व्यक्त करत पुनावाला यांनी या पाचही कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. नियमानुसार या कुटुंबांना जी रक्कम मिळायची आहे ती मिळेलच मात्र, आम्ही प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत या पाचही मृतांच्या कुटुंबीयांना देत आहोत, असे पुनावाला यांनी जाहीर केले.

सीरम इन्स्टिट्युटमध्ये सहा मजली नवीन इमारतीचे काम सुरू असून याच इमारतीत आज दुपारी आगीचा भडका उडाला. आग आटोक्यात आल्यानंतर अग्निशमन जवानांनी केलेल्या पाहणीत शेवटच्या मजल्यावर पाच मृतदेह आढळून आले आहेत. या पाचही जणांची ओळख पटली असून हे सर्व जण कंत्राटी मजूर होते. साइटवर इलेक्ट्रिकल काम ते करत होते, असे स्पष्ट झाले आहे. रामाशंकर हरिजन, बिपीन सरोज (दोघेही उत्तर प्रदेशातील), सुशीलकुमार पांडे (बिहार), महेंद्र इंगळे आणि प्रतिक पाष्टे (दोघेही पुण्यातील) अशी मृतांची नावे आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!