पंढरपूर तालुक्यातील 7 गावांत कडक निर्बंध

10 पेक्षा अधिक रुग्ण वाढले : प्रांताधिकारी गुरव यांची माहिती

पंढरपूर : ईगल आय मीडिया

तालुक्यातील ग्रामीण भागातील कोरोना संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी तसेच आवश्यक प्रतिबधात्मक उपाययोजना करण्यासाठी ज्या गावांत 10 किंवा 10 पेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण असतील ते संपूर्ण गांव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी तालुक्यातील 21 गावांत कडक निर्बंध असून आणखी सात गावांत रुग्ण वाढल्याने दिनांक 01 सप्टेंबर 2021 पासून 14 दिवस कडक निर्बंध जाहिर करण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तालुक्यात ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापुर्वी तालुक्यातील 21 गावांत जादा रुग्ण संख्या असल्याने कडक निर्बंध जाहिर करण्यात आले आहेत.

तसेच तालुक्यातील आणखी सात गावांमध्ये कोरोना बाधितांची संख्या 10 पेक्षा जास्त असल्याने संबधित गावांत कडक निर्बंध जाहिर करण्यात आले आहेत. यामध्ये तालुक्यातील वाखरी, तिसंगी, शेळवे, सोनके, सिध्देवाडी, कान्हापुरी, पिराची कुरोली या गावांत कडक निर्बंध जाहीर करण्यात आले असल्याचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले.

संबधित गावांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद राहतील. विशेष तपासणी मोहिमेतंर्गत तालुक्यातील सर्व दुकानदार , व्यापारी, फळे व भाजीपाला विक्रेते, दुध विक्रेते याच्यांसह इतर व्यावसायिकांची आठवड्यातून कोरोना चाचणी करण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतीने मुख्य रस्ता सोडून इतर सर्व मार्ग बंद करावेत. यासाठी आवश्यक जादाच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी. गावांमध्ये येणाऱ्या व जाणाऱ्या व्यक्तींची नोंद ठेवावी. आरोग्य विभागाने मुबलक प्रमाणात औषधसाठा व वैद्यकीय साहित्य उपलब्ध ठेवावे. तसेच ग्रामस्तरीय समितीच्या मदतीने सर्व नागरिकांच्या चाचण्या तसेच लसीकरण करुन घ्यावे. बाधित रुग्णांना घरीच उपचारासाठी न ठेवता तात्काळ कोविड केअर सेंटर, डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर तसेच डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ठेवावे अशा सूचनाही प्रांताधिकारी गुरव यांनी यावेळी दिल्या.

तसेच नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही श्री. गुरव यांनी यावेळी केले.

Leave a Reply

error: Content is protected !!