7 वारकऱ्यांना भरधाव कारने चिरडले

कार्तिकी यात्रेला निघालेल्या वारकऱ्यांवर मृत्यूची झडप

सांगोला : ईगल आय न्यूज

जुनोनी ता. सांगोला या गावाजवळ भीषण अपघात झाला असून दिंडीत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना भरधाव कारने चिरडलं आहे. यामध्ये ७ वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तसंच ८ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, सांगोला – मिरज मार्गावरील अपघातात मृत वारकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये तातडीच्या मदतीची देखील त्यांनी घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी हे वृत्त कळताच तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला तसेच या घटनेतील जखमी वारकऱ्यांना ताबडतोब योग्य ते उपचार देण्यात यावे असे निर्देश दिले. हा अपघात कसा झाला याविषयी तातडीने चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत


मिळालेल्या माहितीनुसार, जठरवाडी या कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील गावातील वारकरी कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघाले होते. मात्र सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाजवळ चालत असताना आज सोमवारी सायंकाळच्या साडे सहा वाजण्याच्या सुमारास एक भरधाव कार थेट दिंडीत घुसली. यावेळी झालेल्या अपघातात तब्बल १५ वारकरी गंभीर जखमी झाले होते. यातील ७ जणांचा मृत्यू झाला असून ८ जणांचा मृत्यूशी संघर्ष सुरू आहे.


अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पाच महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. वारकऱ्यांना धडक देणाऱ्या टाटा नेक्सॉन कारमधील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून कारमधील व्यक्ती या सांगोला तालुक्यातील सोनंद या गावातील रहिवासी आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!