पंढरपूर : ईगल आय मीडिया
येथील यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी शहाजी साळुंखे यांची आज ( सोमवारी ) बिनविरोध निवड करण्यात आली आहे. याबद्दल शहाजी साळुंखे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. तसेच निवडीनंतर संस्थेचे मार्गदर्शक कल्याणराव काळे, सरव्यवस्थापक सुनील देसाई यांनी त्यांचा सत्कार केला.
यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्था ही विठ्ठल परिवारातील एक महत्वाची संस्था आहे. गेल्या 15 वर्षांपासून या संस्थेचे चेअरमन असलेले जेष्ठ नेते नारायण मोरे यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे संस्थेच्या नूतन चेअरमन पदाची आज ( सोमवार दि.28 ) संस्थेच्या कार्यालयात संचालक मंडळाची बैठक संपन्न झाली.
यावेळी संस्थेचे मार्गदर्शक आणि सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या सूचनेनुसार सर्व संमतीने शहाजी साळुंखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नूतन चेअरमन शहाजी साळुंखे यांनी गेल्या सुमारे 10 वर्षांपासून संस्थेचे व्हाईस चेअरमन म्हणून काम पाहिलेले आहे. त्यामुळे आता चेअरमन म्हणून त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली असून सध्याच्या कोरोना संकट काळात सर्वच संस्था अडचणीत असताना शहाजी साळुंखे आणि संचालक संस्थेची यशस्वी घोडदौड कायम ठेवतील असा विश्वास सभासदातून व्यक्त होत आहे.