उद्या खा. शरद पवार श्री विठ्ठल कारखान्यावर : अभिजाती पाटलांच्या राजकीय निर्णयाकडे तालुक्याचे लक्ष
पंढरपूर ; ईगल आय न्युज
रविवार दि. ७ मे रोजी श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याच्या बायो – सीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन व शेतकरी मेळावा होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असून यावेळी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे सुध्दा उपस्थित राहणार आहेत.दरम्यान, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या राजकीय निर्णयाकडे तालुक्याचे लक्ष लागले. अद्याप कोणत्याही पक्षात नसलेले पाटील उद्या राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करतात का याकडे तालुक्याच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
हे मान्यवर उपस्थित राहणार
या मेळाव्यास उस्मानाबादचे खा. ओमराजे निंबाळकर, आ. बबन दादा शिंदे, आ. रवींद्र धंगेकर, आ. कैलास पाटील , आता. संजय मामा शिंदे, आ. यशवंत माने, माजी मंत्री दिलीप सोपल, माजी आ. राजन पाटील, मा. आ. दीपक साळुंखे पाटील, मा. आमदार दत्तात्रय सावंत, मा. आ. धनाजी साठे यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना अभिजित पाटील यांनी जिंकला आहे. पाटील यांनी कारखाना ताब्यात घेतल्यानंतर शेतकरी आणि तोडणी, वाहतूकदारांची देणी दिली आहेत. यंदाच्या हंगामात ७ लाख २४ हजार टन गाळप करून जाहीर केल्यानुसार पहिला हप्ता हि दिलेला आहे. त्यामुळे श्री विठ्ठल च्या सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
याच पार्श्वभूमीवर विठ्ठल कारखान्यावर बायो सी एन जी प्रकल्प उभारण्यात येत आहे. खा. शरद पवार यांच्या सहकार्याने खाजगी उद्योजकांच्या मदतीने बायो सी एन जी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या भूमिपूजनानंतर शेतकरी मेळावा संपन्न होणार आहे. या मेळाव्यात खा. शरद पवार काय बोलतात , अभिजित पाटील आपली पुढील वाटचाल राष्ट्रवादीच्या अधिकृत झेंड्याखाली असेल असे जाहीर करतात का ?