शिवसेनेचे मोहोळ विधानसभेचे उमेदवार राजू खरे यांच्या प्रयत्नांना यश
पंढरपूर : ईगल आय न्यूज
मोहोळ तालुक्यातील ३० गावातील पाणंद रस्ते, पेव्हर ब्लॉक, स्मशानभूमीचा विकास, काँक्रिट रस्ते, शेतकऱ्यांना विहिरी, आदी विकास कामासाठी, राजू खरे यांच्या आग्रहाखातर खास बाब म्हणून नुकत्याच संपन्न झालेल्या पावसाळी अधिवेशन काळात मंजूरी मिळाली असल्याची माहिती राज्याचे मंत्री संदीपान भुमरे यांनी दिली.
पंढरीत एका धार्मिक कार्यक्रमानिमित्त राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री ना. संदीपान भुमरे, अल्पसंख्याक व पणन मंत्री ना. अब्दुल सत्तार आणि विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे हे उपस्थित राहिले होते. यावेळी मोहोळ विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे नेते राजू खरे यांनी ना. भूमरे यांचे स्वागत केले. यानंतर बोलताना ना. भुमरे यांनी ही माहिती दिली.
यावेळी बोलताना भुमरे म्हणाले की, राजू खरे हे मागील अनेक वर्षापासून आमचे सहकारी मित्र आहेत. त्यांनी मागणी केली आणि पाठपुरावा केला म्हणून मोहोळ तालुक्यातील २५ ते ३० गावामधून पाणंद रस्ते, फेव्हर ब्लॉक, स्मशानभूमीचा विकास, काँक्रिट रस्ते, विहिरी, आदी विकास कामासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी खास बाब म्हणून या पावसाळी अधिवेशन काळात मंजूर करून दिला आहे.
यावेळी ना. भूमरे यांच्यासह मंत्री सत्तार यांनी पैठण भागातील भाविकांसाठी पंढरपूर मठ बांधण्यासाठी शहरालगत दोन एकर जमिनीचीही पाहणी वरील आलेल्या मान्यवरांनी केली.
यावेळी बोलताना मंत्री भूमरे म्हणाले की, राजू खरे हेच २०१९ ला आमच्या सोबत आमदार म्हणून दिसले असते. मात्र अपरिहार्य कारणामुळे त्यांना त्यावेळी थांबावे लागले. मात्र आगामी २०२४ चे निवडणुकीत शिवसेना नेते रामदास कदम, राजू खरे यांचे जिवाभावाचे मित्र आणि शिवसेनेचे पक्ष प्रतोद आ. भरतशेठ गोगावले आणि मी स्वतः यांनाच शिवसेनेची उमेदवारी मिळवून देण्यासाठी आगृही तर राहणारच आहे. आणि त्यांना आमदार म्हणून विजयी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचेही आवर्जून सांगितले.
अधिक मास आणि ह. भ. प. पंढरीनाथ महाराज तावरे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी रविवारी ना. भूमरे, ना. अब्दुल सत्तार आणि आ.हरिभाऊ बागडे हे आले होते. यावेळी शिवसेना सोलापूर लोकसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख महेश साठे, सोलापूर विभागाचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे, पंढरपूर विभागाचे जिल्हा प्रमुख चरणराज चवरे, तालुका प्रमुख शिवाजी बाबर, पैलवान बाळासाहेब चवरे, संजय मस्के, विजय खरे, समाधान बाबर, सुभाष बनसोडे, सिद्धार्थ लोखंडे यांचेसह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.