श्री विठ्ठल मंदिर : सुब्रह्मण्यन स्वामी यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका

 याचिकेला विरोध न करण्याचे सरकारला केले आवाहन

पंढरपूर : eagle eye news

श्री विठ्ठल – रुक्मिणी  मंदिर राज्य सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करण्याची मागणी करणारी जनहित याचिका भाजपचे माजी राज्यसभा सदस्य सुब्रह्मण्यम स्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्याच बरोबर राज्यातील सरकारला या याचिकेस न्यायालयात विरोध करू नये, असे आवाहन केले आहे.

श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिर जानेवारी २०१४ पासून पंढरपूर मंदिरे अधिनियमानुसार राज्य शासन नियुक्त मंदिर समितीच्या ताब्यात आहे. साने गुरुजींपासून अनेक वर्षे वारकऱ्यांनी केलेल्या मागण्या आणि आंदोलनानंतर तसेच  प्रदीर्घ न्यायालयीन खटला चालल्यानंतर जानेवारी २०१४ साली सर्वोच्च न्यायालयाने बडवे – उत्पात आणि सेवाधारी यांचे हक्क नाकारून पंढरपूर मंदिर अधिनियमास मान्यता दिली होती. त्यानंतर राज्य सरकार च्या नियंत्रणाखाली मंदिर समितीचे कामकाज चालू आहे.

दरम्यान सेवाधारी बडवे – उत्पात यांच्या प्रतिनिधींनी सुब्रह्मण्यम स्वामी यांची भेट घेऊन विठ्ठल – रुक्मिणी मंदिर पुन्हा सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करण्याची विनंती केली होती. डिसेम्बर महिन्यात स्वामी यांनी पंढरपुरात येऊन एक बैठक घेतली आणि मंदिर सरकार नियंत्रण मुक्त करण्यासाठी मुंबई उच्च नायालयात जनहित याचिका दाखल करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार बुधवारी सुब्रह्मण्यम स्वामी आणि जगदीश शेट्टी यांनी संयुक्त याचिका दाखल केली आहे. त्यांच्यावतीने  ऍड. मनोहर शेट्टी आणि  ऍड शंतनू शेट्टी हे कामकाज पाहणार आहेत.

दरम्यान,  यासंदर्भात स्वामी यांनी ट्विटरवर पोस्ट करून पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकार मुक्त करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याची माहिती दिली आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने या  याचिकेला  उच्च न्यायलयात विरोध न करता चूक झाली हे मान्य करून मंदिर सरकार नियंत्रण मुक्त करावे असे आवाहन केले आहे. 

Leave a Reply

error: Content is protected !!