पवारांच्या बैठकीत महत्वाचे निर्णय झाले

भगीरथ भालके यांनी कारखाना चालवावा , आम्ही पाठीशी राहू : युवराज पाटील

पंढरपूर : ईगल आय मीडिया

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना चालू झाला पाहिजे, तो बंद राहू नये या हेतूने खा. शरद पवार यांनी पुण्यात संचालक मंडळ आणि राज्य सहकारी बँक, साखर आयुक्त यांची बैठक घेतली. या बैठकीचे फलित म्हणूनच काही चांगले निर्णय झाले आहेत. त्यामुळे आता भगीरथ भालके यांनी साखर कारखाना चालवावा, आम्ही पाठीशी राहू अशी ग्वाही विठ्ठल चे संचालक युवराज पाटील यांनी दिली.

आज पंढरपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. गणेश पाटील, राष्ट्रवादी चे माजी तालुकाध्यक्ष ऍड. दीपक पवार उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना पाटील म्हणाले की, भगीरथ भालके 9 महिन्यापासून चेअरमन आहेत, यंदाच्या हंगामात कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक त्या वेगाने प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे आपण मे – जून मध्येच कारखाना चालवू, अधिकार द्या अशी संचालक मंडळात मागणी केली होती. तसेच खा. शरद पवार यांना भेटून अडचणींवर मार्ग काढण्यासाठी बैठक बोलावण्याची मागणी केली होती. त्यानुसार पवार साहेबांनी राज्य सहकारी बँकेचे प्रशासक, साखर आयुक्त आणि संचालक मंडळाची बैठक पुण्यात बोलावली.

तिथे मी श्री विठ्ठल चॅरिटेबल ट्रस्ट च्या मार्फत कारखाना चालवतो असे सांगितले होते. मात्र तांत्रिक बाबीमुळे सध्या ते शक्य नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर खा.पवारांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास स्व.यशवंतराव चव्हाण यांचे हात लागलेले आहेत, कै. औदुंबर अण्णांनी कष्टाने उभा केला आहे, त्यामुळे अडचणीतून मार्ग काढून कारखाना सुरू केला पाहिजे यासाठी काही, सूचना, मार्गदर्शन केले.

राज्य सहकारी बँकेचे प्रशासक अनसकर यांनी बँकेच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यास तसेच सेकंड चार्ज साठी ना हरकत देण्यास मान्यता दिली आहे. या दोन्ही ही बाबी अतिशय महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कारखाना सुरू करता येईल मात्र चेअरमन भगीरथ भालके यांनी प्रयत्न करावेत, आम्ही पाठीशी राहू, असेही यावेळी युवराज पाटील म्हणाले.

Leave a Reply

error: Content is protected !!