काय होणार निर्णय ? तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष
पंढरपूर : ईगल आय मीडिया
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अडचणींवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी उद्या पुण्यात संचालक मंडळाची बैठक बोलावली आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत काय निर्णय होतो? काय तोडगा निघतो याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
पंढरपूर तालुक्याचा आर्थिक कणा असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यासमोर सध्या मोठे आर्थिक संकट उभा राहिले आहे. कारखान्यास आगामी ऊस गाळप हंगामासाठी आर्थिक गरज असून राज्य सहकारी बँकेसह इतर मार्गाने पैसे उभा करण्याचा प्रयत्न चेअरमन भगीरथ भालके यांनी करून पाहिला. मात्र संचालक मंडळातच मतभेद असल्याने एकजीवाने प्रयत्न झाले नाहीत. भगिरथ भालके, कल्याणराव काळे यांनी प्रयत्न केल्यानंतर ही मार्ग निघत नाही. त्यातच काही संचालकांनी खा.शरद पवारांची भेट घेऊन आपण पैसे उभा करतो असा दावा केला आहे. त्यामुळे संचालक मंडळातील हा वाद, पैसे मिळण्यात येत असलेली अडचण आणि एकूणच विठ्ठल परिवारातील अंतर्गत खदखद या सर्व विषयांवर उद्या चर्चा होण्याची शक्यता आहे.
उद्या ( दि.1 ऑक्टोबर) रोजी खा.शरद पवारांनी विठ्ठल च्या सर्व संचालकांची बैठक पुण्यात बोलावली आहे. या बैठकीत विठ्ठलच्या गाळप हंगाम, त्यासाठी लागणारा अर्थ पुरवठा, संचालकांतील मतभेद याबाबत चर्चा होऊन मार्ग निघण्याची अपेक्षा बळावली आहे. त्यादृष्टीने तालुक्यातील शेतकऱ्यांचे उद्याच्या बैठकीकडे लक्ष लागले आहे.