भोयरेत शेळी सह गाईवर केला हल्ला
मोहोळ : ईगल आय मीडिया
मोहोळ तालुक्यातील सिना नदी काठी बिबट्याची दहशत वाढत चालली आहे. सोमवारी भोयरे गावच्या शिवारात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रविवारी रात्री बिबट्याने येथील एका शेतकऱ्याच्या जर्सी गाईवर हल्ला करून तिची शिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र या हल्ल्यात सदरची गाय गंभीर जखमी झाली. वन विभागाने सोमवारी सायंकाळी या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून मोहोळ शहर व सीना नदी काठच्या काही गावांमध्ये बिबट्याचा वावर आहे. या बिबट्याने आतापर्यंत मोहोळ येथील गुरव वस्तीवर एका वासरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच त्याने एक घोड्याचे शिंगरू आणि मोहोळ शहरातील घागरे वस्ती येथील एका शेळीचा फडशा पाडला आहे. तर भोयरे येथील एका शेळी वर हल्ला करुन जखमी केले आहे. त्यानंतर रविवारी रात्री भोयरे गावातील संतोष पवार या शेतकऱ्याच्या एका जर्सी गाय वर हल्ला करून शिकार करण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकर्यांनी वेळीच आरडाओरड केल्याने बिबट्याचा बेत फसला आहे. घटनेची माहिती मिळताच सोमवारी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे. या बिबट्याने सीना नदी काठच्या परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी भीतीच्या सावटाखाली जगत आहे.
दरम्यान, बिबट्या कडून वारंवार होणाऱ्या हल्ल्यामुळे मोहोळ तालुका वन विभाग प्रशासनाने भोयरे परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी सोमवारी सायंकाळी पिंजरा लावण्यात आल्याची माहिती मोहोळचे वनरक्षक सचिन कांबळे यांनी दिली आहे.