जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांपेक्षा खाली आला
टीम : ईगल आय मीडिया
पुढील आठवड्यातील निर्बंध हटवण्यासंदर्भातील माहिती राज्य सरकारने प्रसिद्ध केली असून यात राज्यातील सर्वच जिल्ह्यांचा पॉझिटिव्हीटी रेट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे पाच टक्क्यांच्या आत पॉझिटिव्हीटी रेट असलेल्या जिल्ह्यांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात होत असल्याने सोमवार पासून सगळे निर्बंध हटणार आहेत.
राज्य सरकारने निर्बंध हटवण्यासंदर्भात पाच गट तयार केलेले आहेत. पॉझिटिव्हीटी रेट आणि उपलब्ध ऑक्सिजन बेडची संख्या यानुसार या जिल्ह्यांचं वर्गीकरण केलं जातं. सरकारने काढलेल्या आदेशाप्रमाणे ५ टक्क्यांच्या आत पॉझिटिव्हीटी रेट असणाऱ्या जिल्ह्यांतील निर्बंध पूर्णपणे हटवण्यास परवानगी आहे. तर सर्वात जास्त पॉझिटिव्हीटी रेट असणाऱ्या जिल्ह्यातील निर्बंध वाढवण्याचे निर्देश दिलेले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत आहे. गुरुवार अखेर केलेल्या पाहणी नुसार सोलापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट 3.73 टक्के आला असल्याने सोमवार पासून संपूर्ण जिल्ह्यातील निर्बंध दूर केले जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी दोन दिवसात आदेश काढतील अशी शक्यता आहे. त्यानंतर जिल्ह्यात लग्नसमारंभ, हॉटेल, मॉल, जिम, प्रायव्हेट ऑफिसेस सुरू होण्यास मोकळीक मिळू शकते.
निर्बंध हटवण्यासंदर्भातील पंचस्तरीय कार्यपद्धती लागू करून दोन आठवडे झाले आहेत.
पहिल्या गटातील जिल्हे (कंसात पॉझिटिव्हिटी रेट टक्क्यांमध्ये) अहमदनगर (३.०६), अकोला (४.९७), अमरावती (१.९७), औरंगाबाद (२.९४), भंडारा (०.९६), बुलडाणा (२.९८), चंद्रपूर (०.६२), धुळे (२.४२), गडचिरोली (३.५३), गोंदिया (०.२७), हिंगोली (१.९३), जळगाव (०.९५), जालना (१.५१), लातूर (२.५५), मुंबई (३.७९), नागपूर (१.२५), नांदेड (१.९४), नंदूरबार (३.१३), नाशिक (४.३९), परभणी (०.९४), सोलापूर (३.७३), ठाणे (४.६९), वर्धा (१.१२), वाशिम (२.७९), यवतमाळ (३.७९).
पहिल्या गटात येणाऱ्या शहरांतील आणि जिल्ह्यांतील सर्व प्रकारची दुकाने पूर्ववत सुरू होणार. मॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहेसुद्धा नियमितपणे सुरू होणार. रेस्तरां सुरू करण्यासाठीही परवानगी. लोकल सेवा पूर्ववत होईल मात्र, स्थितीनुसार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागास निर्बंध घालण्याची मुभा असेल.
सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली राहतील. वॉकिंग आणि सायकलिंगला परवानगी असेल. सर्व खासगी कार्यालये उघडण्याची मुभा असुन शासकीय कार्यालयेही १०० टक्के कर्मचारी क्षमतेनं सुरू राहतील. विविध खेळ, चित्रीकरण, सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांनाही मुभा असेल. लग्न सोहळा, अंत्यविधी, बैठका, निवडणूक यावर कोणतेही बंधने नसतील. जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना परवानगी असणार आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत असेल करण्यात आली आहे. या भागात जमावबंदीही नसणार आहे.