7 जणांनी दिल्या मुलाखती : पंढरपूर चे 4 जण
मेहबूब1शेख यांच्यासोबत इच्छुक कार्यकर्ते
सोलापूर : ईगल आय मीडिया
गेल्या 4 महिन्यापासून सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची निवड चर्चेत होती. आज युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सोलापूर येथे इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. येत्या 8 दिवसांत यावर अंतिम निर्णय होऊन नवीन अध्यक्ष जाहीर होईल असे सांगितले जाते.
सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक च्या अध्यक्षपदी सध्या विक्रांत माने हे आहेत मात्र आता नवीन अध्यक्ष निवड करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी आज प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे, जिल्हा प्रभारी शरद लाड हे आले होते.
यावेळी पंढरपूर तालुक्यातील ऍड. गणेश पाटील, संदीप मांडवे, अरुण आसबे, श्रीकांत शिंदे या चौघांनी तर करमाळा येथील अभिषेक आव्हाड, प्रताप जगताप आणि सोलापूरच्या प्रशांत बाबर यांनी मुलाखत दिली. विद्यमान जिल्हाध्यक्ष विक्रांत माने हे सुद्धा पून्हा इच्छुक असल्याचे यावेळी त्यांनी बोलून दाखवले.
मुलाखती झाल्यानंतर मेहबूब शेख यांनी, एकूण अहवाल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर ठेवला जाईल आणि तेच अंतिम निवडी करतील असे सांगितले. येत्या 8 ते 15 दिवसांत नूतन अध्यक्ष निवड जाहीर होईल असेही शेख म्हणाले.