हमाल पंचायत चे जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांची माहिती
पंढरपूर : ईगल आय मीडिया
सोलापूर जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामातील हमाल कामगारांचे गेले कित्येक महिन्यांचे पगार झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने 27 ऑक्टोबर पासून जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामातील कामगार कामबंद आंदोलनाचा इशारा सोलापूर जिल्हा हमाल मापाडी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी दिला आहे. यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी व सहाय्यक कामगार आयुक्त माथाडी बोर्ड यांना देण्यात आले आहे.
या पूर्वी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या दालनामध्ये दि. 27 ऑगस्ट रोजी संबंधित कामगारांच्या थकीत बिलाविषयी चर्चा झाली होती. परंतू या चर्चेनंतर हमाल कामगारांच्या पदरात काही पडले नाही. ऐन दिवाळीमध्ये त्यांच्यावर उपसामारीची वेळ आली आहे. ही बाब गंभीर स्वरूपाची असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी शमा पवार यांना जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी सांगितले. व लवकरात लवकर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या समोरच बैठक घेऊन संबंधित ठेकेदाराचे ठेके रद्द करून जिल्हा पुरवठा अधिकार्यामार्फत माथाडी बोर्डात पगार भरणा करून कामगारांचे पगार करावेत असे शिंदे यांनी सांगितले.
दिलेल्या निवेदनात 27 ऑक्टोबर पासून आपल्या कार्यालयासमोर तसेच ज्या त्या शासकीय धान्य गोदामासमोर माथाडी कामगाराकडून धरणे आंदोलन, आमरण उपोषण, काम बंद आंदोलन व इतरांनाही काम करू देणार नसल्याचे तसेच होणार्या कोणत्याही नुकसानीस आपण स्वत: जबाबदार राहाल, असेही जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे या निवेदनाद्वारे सांगितले आहे.
यावेळी शमा पवार यांनी सर्व माहिती ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयात 27 ऑक्टोबरच्या अगोदर बैठक बोलवून लवकरात लवकर मार्ग काढण्याचे आश्वासन शमा पवार यांनी दिले.