सोलापूर विद्यापीठ : अहिल्यादेवी स्मारक वादात अण्णा डांगे यांची उडी

विद्यापीठाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करून दिला पाठिंबा

माजी मंत्री अण्णा डांगे यांनी काढलेले प्रसिद्धी पत्रक

सोलापूर : ईगल आय मीडिया

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रांगणात बसविण्यात येणारा शिवलिंग हाती घेतलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पुतळाच योग्य आहे. विद्यापीठ स्मारक समितीने घेतलेला हा निर्णयच योग्य असल्याचे सांगत धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री तथा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक विकास प्रतिष्ठान, वाळवाचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी विद्यापीठाच्या निर्णयाला पाठिंबा दर्शविला आहे. याबाबत श्री. डांगे यांनी प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

अण्णा डांगे यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूरच्या आदरणीय कुलगुरू मॅडम, विद्यापीठाचे सिनेट सदस्य व व्यवस्थापन समितीचे मी अभिनंदन करतो. विद्यापीठाच्या प्रांगणात बसविण्यात येणारा “पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा पुतळा इतिहास व परंपरा यांचा योग्य आदर करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या हातात शिवलिंग घेवून उभ्या आहेत” असा उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

पती खंडेराव यांचा रणात अकाली मृत्यू झाल्यानंतर अहिल्यादेवी सती निघाल्या. त्यावेळी सासरे मल्हारराव होळकर यांनी त्यांचे मत परिवर्तन करून त्यांना सती जाण्यापासून परावृत्त केले व हळूहळू जहागिरीच्या कारभाराची जबाबदारी अहिल्यादेवी यांच्यावर सोपवली.

त्यावेळी शपथ घेताना अहिल्यादेवी हातात शिवलिंग घेऊन दरबारात उभा राहून म्हणाल्या की, ‘पितृतुल्ल्य सासरे बाबांनी माझ्यावर विश्वास दाखवून जहागिरीच्या कारभाराची जबाबदारी मला दिली आहे. मी या शंभू महादेवाला साक्ष ठेऊन मी सांगते की आमची प्रजा तिला आम्ही ईश्वराची लेकर आहोत असे मानतो. यातील कोणाबद्दलही कोणत्याही प्रकारचा भेदभाव अथवा अन्याय केला जाणार नाही. जहागिरीच्या कारभारात लबाड्या अथवा चोऱ्या अगर अन्याय या कोणाच्याही असोत त्या खपवून घेतल्या जाणार नाहीत.’ यावरून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने घेतलेला निर्णय किती योग्य व बोलका आहे हे स्पष्ट होते. सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन.” अशा शब्दांत श्री. अण्णा डांगे यांनी आपले समर्थन दर्शविले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!