विक्रमी 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण
टीम : ईगल आय मीडिया
कोरोना मुळे यंदाच्या इयत्ता 10 वी च्या परीक्षा झाल्या नाहीत. शुक्रवारी बोर्डाने 10 वी चा निकाल जाहीर केला. परीक्षा न घेताच निकाल जाहीर होत असल्याने उत्सुकता लागून राहिली होती. तब्बल 22 हजार 384 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. विशेष आणि धक्कादायक म्हणजे परीक्षा न घेता ही 9 शाळांचा निकाल शून्य टक्के जाहीर झाला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत शिक्षण मंडळाने दहावीचा एकूण निकाल ९९.९५ टक्के लागला असल्याची माहिती दिली आहे.
एकूण ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले असल्याची माहिती दिनकर पाटील यांनी दिली आहे. तर ८३ हजार ९६२ विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. राज्यातील २२ हजार ७६७ शाळांमधून १६ लाख ५८ हजार १६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २२ हजार ३८४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर राज्यातील 9 शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे.
दरम्यान निकालात कोकणाने बाजी मारली असून १०० टक्के निकाल लागला आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली असून दहावीच्या २७ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. परीक्षा न देता ही शून्य टक्के निकाल लागला कसा आणि जे 0.05 टक्के विद्यार्थी नापास झाले कसे याबाबत आणखी उत्सुकता निर्माण झाली आहे.