बोर्डाचा नाकर्तेपणा : विद्यार्थी वेठीस

सर्व्हर 6 तासापासून डाऊन : 16 लाख विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत

टीम :  ईगल आय मीडिया

इयत्ता दहावीच्या निकालाची वेबसाईट गेले 6 तास वेबसाईट हँग झाली आहे. वेबसाईट सुरु कधी होणार यावर बोर्डाकडून कोणतेही ठोस उत्तर नाही. त्यामुळे बोर्डाच्या या ढिसाळपणा बद्दल।विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. दरम्यान, सर्व्हर डाऊन का झाले याची चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

राज्यातील दहावी बोर्डाचा निकाल सकाळी 11 वाजताच बोर्डानं पत्रकार परीषद घेत जाहीर केला. आणि दुपारी एकच्या दरम्यानं निकाल विद्यार्थ्यांना http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहायला मिळणार होता. मात्र, दोन्ही वेबसाईट डाऊन झाल्या.

दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी वेबसाईट सर्च करीत आहेत मात्र सर्व्हर डाऊन झाल्याने निकाल पाहता आलेला नाही. वेबसाईट पूर्ववत झाल्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल पाहायला मिळेल. तब्बल सहा तासांहून अधिक वेळ झाला तरी तरी वेबसाईट डाऊन आहेत. यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी यासंदर्भात संताप व्यक्त केला आहे.

एक वाजता निकाल पाहण्यासाठी खुला केल्यावर सर्व्हरवर लोड आला. फायर वॉलवर गर्दी झाली. त्यामुळं वेबसाईट हँग झाली. 60 हजार निकाल डाऊनलोड झाले. दीड लाख लोक आता वेबसाईटवर आहेत. दोन नव्या लिंक तयार केल्या आहेत. वेबसाईट सुस्थितीत यायला थोडा वेळ लागणार आहे, अशी माहिती दिनकर पाटील यांनी दिली.

निकालाच्या वेबसाईट पूर्वस्थितीत येण्यासाठी आणखी काही वेळ लागेल, असं बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितलं आहे.
बोर्डानं नव्यानं दिलेल्या लिंकही डाऊन झाल्या. दहावीच्या निकालाची वेबसाईट सुरु करण्यासाठी एसएससी बोर्डाचे प्रयत्न सुरु आहेत.

दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या 16 लाखांपेक्षा जास्त होती. त्यामुळे वेबसाईटवर निकाल लागण्यास सुरु झाल्यानंतर 16 लाख लोक एकत्र वेबसाईटवर येणे स्वाभाविक आहे. त्यासाठी बोर्डाने सर्व्हरची क्षमता वाढवून ठेवणे आवश्यक होतं. मात्र त्याची तयारी बोर्डाने केलीच नाही हे यावरुन स्पष्ट होतंय. बोर्डाच्या या ढिसाळपणाचा त्रास विद्यार्थी आणि पालकांना होत आहे. या सर्व गैरप्रकाराला कोण जबाबदार? त्यांच्यावर काय कारवाई होणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

3 thoughts on “बोर्डाचा नाकर्तेपणा : विद्यार्थी वेठीस

Leave a Reply

error: Content is protected !!