पंढरपूर : ईगल आय मीडिया
राज्यातील इयत्ता 10 वी पास विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका येत्या 9 ऑगस्ट पासून वितरित केल्या जाणार आहेत. यासंदर्भात राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने आजच एक पत्र विभागीय मंडळांना पाठवले आहे. त्यानुसार 9 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजल्यानंतर ही गुणपत्रे विद्यार्थ्यांना दिली जातील.
यंदा राज्यात कोरोनामुळे इयत्ता 10 वी च्या परीक्षा झालेल्या नाहीत. नुकताच निकष लावून परीक्षा मंडळाने निकाल जाहीर केला आहे. तसेच cet परीक्षा ऑगस्ट अखेर घेऊन 11 वी प्रवेश सुरू केला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना आपल्या 10 वी च्या गुणपत्रिका कधी मिळतात याची प्रतीक्षा होती.
आजच परीक्षा मंडळाने येत्या 7 आणि 9 ऑगस्ट रोजी शाळांना गुणपत्रे वितरित केली जातील आणि 9 ऑगस्ट च्या दुपारी 3 वाजल्यानंतर ती विद्यार्थ्यांना वितरित करावीत असा आदेश काढला आहे. या गुणपत्रिका घेऊन जाण्यासाठी विद्यार्थ्यांना मर्यादित कालावधी देऊ नये, जेणेकरून गर्दी होणार नाही.
कोविड नियम पाळून पालकांना आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीने शाळेत येऊन गुणपत्रिका घेऊन जाता याव्यात यासाठी शाळांनी व्यवस्था करावी अशा सूचना केल्या आहेत. त्यानुसार येत्या 9 ऑगस्टच्या दुपारी 3 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वितरित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.