राज्य बँक घोटाळ्या प्रकरणी ६५ संचालकांना क्लीन चिट

अजित पवारांसह हसन मुश्रीफ विजयसिंह मोहिते-पाटील, माणिकराव पाटील, आनंदराव आडसूळना मोठा दिलासा

टीम : ईगल आय मीडिया


बहुचर्चित राज्य सहकारी बँक कथित घोटाळा प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह ६५ संचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सहकार विभागाच्या अहवालामध्ये अजित पवार यांच्यासह ६५ संचालकांना क्लिन चिट देण्यात आली आहे. यापूर्वी एसआयटीने देखीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य सहकारी बँकेच्या ७५ जणांना क्लीन चीट दिली होती.

राज्य सहकारी बँक कथित घोटाळा २५ हजार कोटी रुपयांचा होता. प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, बँकेचे तत्कालीन अध्यक्ष माणिकराव पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक, आनंदराव आडसूळ आदिंच्या नावाचा समावेश करण्यात आला होता.

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण उजेडात आल्यानंतर राज्याच्या सहकार विभागाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीचे गठन केले होते. या समितीने या प्रकरणाचा अहवाल सहकार आयुक्तांकडे सादर केला आहे. या चौकशी समितीच्या अहवालात उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह एकूण ६५ संचालकांना दिलासा मिळाला असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

समितीच्या अहवालात तत्कालिन संचालक मंडळावर ठपका ठेवण्यात आला होता. सन २०११ मध्ये रिझर्व्ह बँकेने देखील हे मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता.निवृत्त न्यायाधीश राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विधानसभेत म्हटले होते. त्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली होती. समितीचा चौकशी अहवाल सरकार आयुक्तांकडे सादर करण्यात आला.

ऑगस्ट २०१९ मध्ये राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर या कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. मात्र, एसआयटीने या प्रकरणी कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता.

Leave a Reply

error: Content is protected !!