जामिनावर लगेच सुटका : अनंत कुरमुसे मारहाण प्रकरण
टीम : ईगल आय मीडिया
राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक केली असून नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांनी या माहितीस दुजोरा देण्यात आला आहे. दरम्यान, ठाकरे सरकारमधील मंत्र्यावर झालेल्या या कारवाईन मोठी खळबळ उडाली आहे.
अनंत करमुसे यांना जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३६५, ३२४, १४३, १४८, ५०६ अन्वये गुन्हा दाखल होता. याच गुन्ह्यात आव्हाड यांच्यावर आज अटकेची कारवाई करण्यात आली.
त्यांना पोलिसांनी कोर्टात हजर केले असता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. १० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर व हमीपत्रावर त्यांची सुटका करण्यात आली आहे.
अनंत करमुसे यांची याचिका मुंबई हायकोर्टात प्रलंबित आहे. एफआयआर नोंद होऊन दीड वर्ष उलटल्यानंतरही आव्हाड यांच्यावर कारवाई होत नसल्याचे करमुसे यांच्याकडून हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी कारवाई केली असण्याची शक्यता आहे.