राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला निर्णय : मंगल कार्यालयाना ही दिली परवानगी
टीम : ईगल आय मीडिया
राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. आज झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, ही सर्व हॉटेल, रेस्टॉरंट १५ ऑगस्टपासून ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येणार आहेत. यासोबत मॉल्सही सुरू होणार आहेत. मात्र, सिनेमागृह, नाट्यगृहे, प्रार्थनास्थळांवर पुढील आदेशापर्यंत बंदी कायम राहील, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
कोरोनाची तीव्रता कमी झाल्याने व्यावसायिकांना सूट देण्याची मागणी व्यावसायिक करीत होते. या मागणीचा विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सच्या बैठकीत यासंबंधी चर्चा केली. त्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला असून, आता १५ ऑगस्टपासून हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, प्रार्थनास्थळे, सिनेमागृहे, नाट्यगृहे अजूनही बंदच राहणार आहेत.
यासोबतच राज्यात सर्व दुकाने रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्यासही राज्य सरकारने मंजुरी दिली. याशिवाय मॉल्सही १५ ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. मात्र, या मॉल्समध्ये दोन लस घेतलेल्या लोकांनाच प्रवेश मिळणार आहे, असेही टोपे यांनी सांगितले.
तसेच मंगल कार्यालयेही ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येणार आहेत. मंगल कार्यालयात १०० जणांच्या उपस्थितीत विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे, तर प्रांगणात आयोजित केलेल्या विवाह सोहळ्यासाठी २०० लोकांना उपस्थित राहण्यास मुभा देण्यात आली आहे.
हॉटेल, रेस्टॉरंटला ५० टक्के क्षमतेने मुभा देण्यात आली असली, तरी तेथे काम करणा-या लोकांना दोन्ही डोस बंधनकारक आहेत, अशा लोकांनाच तेथे काम करता येणार आहे. याशिवाय खाजगी कार्यालयेदेखील आता २४ तास सुरू राहणार आहेत.