कौठाळी ( ता.पंढरपूर ) येथील दुर्घटना
आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला ऊसाचा फड
पंढरपूर : ईगल आय मीडिया
कौठाळी ( ता. पंढरपूर ) येथील गोडसे वस्ती याठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे आग लागून सुमारे 27 एकर ऊस जळून खाक झाला असून यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शेतकरी अडचणीत सापडला आहे.
शनिवारी सकाळच्या सुमारास महावितरणच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या मेन लाईनची तार तुटून पडल्यामुळे ऊसाला आग लागली. सलग असणारे जवळपास 27 एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसला असून यामध्ये हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असल्याची भावना शेतकर्यांतून व्यक्त होत आहे.
याबाबत अनेक वेळा महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगून पत्रव्यवहार करूनही शेतामधून जाणाऱ्या लाईन कडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे असे प्रकार घडत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
चार महिन्यापूर्वी ही धुमाळ वस्ती रोड वरील ऊस शॉर्टसर्किट होऊन आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता, याबाबतही शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना समक्ष भेटून तारा तोडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची माहिती दिली होती. गाव कामगार तलाठी अब्दुल रहिम चांदकोटे यांनी पंचनामा केला असून याबाबत शेतकऱ्यांनीही गुन्हा दाखल करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.