सभासदांची यादी आणि माहिती द्या

साखर संचालकांचे सहकार शिरोमणी साखर कारखाना व्यवस्थापनास आदेश

पंढरपूर : ईगल आय मीडिया

भाळवणी ( ता.पंढरपूर ) येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याने माजी संचालक ऍड. दिपक पवार यांना त्यांनी मागितलेली माहिती द्यावी असे आदेश प्रादेशिक सह संचालक यांनी दिले आहेत. त्यामुळे सहकार शिरोमणी चे एकूण सभासद, वाढवलेले आणि कमी केलेले सभासद यांची माहिती देण्यात यावेत असे सांगितले आहे.

सहकार शिरोमणी चे माजी संचालक ऍड. दिपक पवार यांनी सभासद यादी मिळावी म्हणून गेल्या दोन महिन्यापासून प्रयत्न सुरू आहेत.विद्यमान संचालक मंडळाने हजारो सभासदांचे सभासदत्व रद्द केल्याची चर्चा आहे. तसेच अगदी जवळचे आणि कारखाना कार्यक्षत्राबाहेरील नवीन सभासद केल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे जुन्या आणि नव्या सभासदांची माहिती माजी संचालक ऍड. दीपक पवार यांनी मागितली आहे. मात्र ती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप केला आहे.

सहकार शिरोमणी साखर कारखान्यावर साखर आयुक्त यांनी दिनांक २३/०६/२०२१ रोजी आरआरसी कारवाईचा आदेश दिला. मात्र आरआरसी कारवाईचा आदेश होऊन दोन महिने उलटून गेले तरी देखील शेतकऱ्यांना एफआरफी ची रक्कम व त्यावरील व्याज मिळाले नाही. त्यासाठी ऍड.दीपक पवार यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना भेटून निवेदन दिले. व आरआरसी कारवाई ची अंमलबजावणी त्वरित करून येत्या आठ दिवसांमध्ये शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, त्यांच्या हक्काची रक्कम लवकरात लवकर त्यांना उपलब्ध करून द्यावी. अन्यथा इतर न्यायसंस्थेचे दरवाजे आम्हाला ठोठवावे लागतील व आपल्या कार्यालयासमोर आत्महत्या करण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय उरणार नाही, असा इशारा दिला. त्यावर येत्या ८ दिवसामध्ये कारवाई करू असें आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले.

त्या संदर्भात प्रादेशिक सहसंचालक (साखर) सोलापूर यांनी दिनांक १४ जुलै २०२१ रोजी अर्जदार दीपक पवार यांना त्यांनी मागितलेली सभासदांची माहिती देणे बंधनकारक असून ती माहिती त्वरित द्यावी अशा पद्धतीचा आदेश केला होता, परंतु आज तागायत सभासदांची माहिती दिलेली नाही. म्हणून प्रादेशिक सहसंचालक साखर सोलापूर यांनी आज ( २७ ऑगस्ट २०२१ ) रोजी त्यांना त्वरित माहिती द्यावी अन्यथा पुढील प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असा आदेश काढलेला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!