प्रथम वर्ष इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी कॅप राऊंड-१ चे ऑप्शन्स भरण्याची प्रक्रिया दि.२० जुलै पासून

दि.२२ जुलै पर्यंत चालणार ही प्रक्रिया : प्रा.डॉ.बी पी रोंगे


पंढरपूर : ईगल आय न्यूज

‘शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी प्रथम वर्ष इंजिनिअरिंग प्रवेशाची पहिली फेरी (फर्स्ट कॅप राऊंड)चे ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया गुरुवार, दि.२० जुलै २०२३ पासून ते शनिवार, दि.२२ जुलै २०२३ पर्यंत म्हणजेच एकूण तीन दिवस चालणार आहे. या कालावधीत स्वेरी अभियांत्रिकीच्या फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.क्रमांक ६२२०) मध्ये ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरण्याची सोय करण्यात आली आहे. या पहिल्या प्रवेश फेरीची अलॉटमेंट यादी अधिकृत संकेतस्थळावर मंगळवार दि. २५ जुलै २०२३ रोजी प्रसिद्ध होणार आहे. ज्यांनी पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठी कॅप रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन केले त्यांना या प्रवेश फेरीचा लाभ घेता येईल.’ अशी माहीती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.


सन २०२३-२४ मध्ये पदवी अभियांत्रिकीच्या प्रवेशाकरीता दि.२४ जून ते ११ जुलै २०२३ या कालावधी दरम्यान ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, भरलेले अर्ज स्विकारुन कागदपत्रांची तपासणी, पडताळणी, व निश्चिती करणे आदी प्रक्रिया पूर्ण झाल्या असून तात्पुरती गुणवत्ता यादी १४ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. दि.१५ जुलै ते १७ जुलै २०२३ (साय.५ वाजेपर्यंत) दरम्यान प्रवेश अर्जातील चुका व त्रुटींची दुरुस्ती (ग्रीव्हेंन्स) करण्याची मुभा दिली जाणार आहे. त्यानंतर दि.१९ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या https://cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे.

त्यानंतर पहिली फेरी (फर्स्ट कॅप राऊंड) चे ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया गुरुवार, दि.२० जुलै पासून ते शनिवार, दि.२२ जुलै या दरम्यान होणार आहे. या पहिल्या फेरीमध्ये योग्य आणि पसंतीचे महाविद्यालय अथवा योग्य ब्रँच बाबतचे पसंतीक्रम ऑनलाईन भरावे लागणार आहेत. यासाठी विद्यार्थी व पालकांनी पूर्णपणे अभ्यास करून कॅप राऊंड-१ चे ऑप्शन फॉर्म भरणे अत्यंत गरजेचे आहे. महाविद्यालय निवडताना महाविद्यालयात दरवर्षी होणारे प्रवेश, विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल, कॅम्पस प्लेसमेंटची संख्या, वसतिगृह सुविधा, इतर सोयी-सुविधा, उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, संशोधने, मानांकने या महत्वाच्या बाबींचा प्रामुख्याने विचार करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करून करिअरच्या दृष्टीने योग्य महाविद्यालयाची निवड करणे अत्यंत गरजेचे आहे.

पहिल्या प्रवेश फेरीचे जागावाटप (अलॉटमेंट) दि.२५ जुलै रोजी प्रदर्शित केले जाणार आहे. पहिल्या फेरीच्या जागावाटपानंतर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन बुधवार दि.२६ जुलै ते शुक्रवार दि.२८ जुलै २०२३ रोजी सायं. ५:०० वाजेपर्यंत आवश्यक कागदपत्रे व शुल्क भरून प्रवेशाची निश्चिती करावी लागणार आहे. प्रथम वर्ष पदवी इंजिनिअरिंगच्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा.करण पाटील (९५९५९२११५४) व प्रा.उत्तम अनुसे (९१६८६५५३६५) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तसेच अभियांत्रिकीला सातत्याने मिळत असलेल्या अभूतपूर्व यशाच्या पार्श्वभूमीवर या पहिल्या फेरीला देखील विक्रमी गर्दी होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!