लॉक डाऊनमधील वीज बिल माफ करा

स्वाभिमानीचे तहसीलसमोर आंदोलन : वीज बिलाची होळी

पंढरपूर : ईगल आय मीडिया

लॉकडाऊन काळातील तीन महिन्याचे लाईट बिल शासनाने माफ करावे, दुधाला 30 रुपये प्रति लिटर दर मिळावा तसेच ऑक्टोबर 2019 मध्ये भीमा नदीकाठच्या गावांमध्ये आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी पंढरपूर येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी लाईट बिलाची होळी देखील करण्यात आली.

कोरोना महामारी मुळे शासनाकडुन लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले. यामुळे उद्योगधंदे ठप्प झाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. यामुळे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यातच वीज वितरण कंपनीकडून विज बिल वसुलीसाठी प्रयत्न सुरू आहेत. सामान्य माणसाला विज बिल भरणे सद्यस्थितीत अडचणीची ठरत असल्यामुळे तीन महिन्यांचे लाईट बिल माफ करावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली. लॉकडाऊन मुळे दुग्धव्यवसायालाही मोठा फटका बसला आहे. दुधाचे दर हे ३२ रुपयांवरून १८ ते २० रुपयांवर आले आहेत. शासनाने यामध्ये हस्तक्षेप करून लिटरला ३० रुपये दर मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
ऑक्टोबर २०१९ मध्ये भीमा नदीला महापूर आल्यानंतर अनेक नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले होते. तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यासंदर्भातील पंचनामे होऊनही अद्याप संबंधितांना नुकसान भरपाई मिळालेली नाही, सदरची नुकसानभरपाई त्वरित मिळावी अशीही मागणी करण्यात आली.

यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, युवा आघाडी जिल्हाअध्यक्ष विजय रणदिवे, युवा आघाडी तालुका अध्यक्ष शहाजहान शेख, ऍड. विजयकुमार नागटिळक, सचिन ताटे, सुधाकर मोरे, रायाप्पा हळणवर, आबा शिंदे यांच्यासह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!