स्वाभिमानी चे मंगळवारी दूध बंद आंदोलन : माजी खा. राजू शेट्टी

दूध पाऊडर, बटर यावरील जीएसटी रद्द करण्याची मागणी

पंढरपूर : ईगल आय मीडिया

केंद्र सरकारने दूध पावडर, बटर, तूप यावरील जीएसटी रद्द करावा, दूध पावडरचा बफर स्टाॅक करावा, तसेच राज्य सरकारने दूधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान द्यावे या मागणीसाठी दि. २१ जुलै रोजी दूध बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली आहे.

कोरोना विषाणूमुळे दुधाचा दर हा ३२ ते ३५ रुपयांवरून १९ ते २० रुपयांवर आला आहे. यामुळे राज्यातील सुमारे ४६ लाख दूध व्यावसायिकांना फटका बसला आहे. लॉकडाऊनमध्ये दुधाच्या मागणीतही घट झाली असून ५२ लाख लिटर दूध शिल्लक राहत आहे. सुमारे दीड लाख टन दूध पावडर शिल्लक आहे. दूध पावडरचे दर खाली आल्यामुळे त्याचा परिणाम शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दूध दारावर झाला आहे. कोरोना संकटाच्या काळातही स्वतःचा जीव धोक्यात घालून दुग्ध उत्पादक शेतकरी सर्वांना दूधपुरवठा करीत आहे. मात्र, त्याला लिटरमागे १० ते १२ रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. राज्य सरकारने प्रति लिटर पाच रुपये अनुदान थेट दूध उत्पादकांच्या खात्यावर जमा करावे. पुढचे तीन महिने हे अनुदान देण्यात यावे. यामुळे सरकारच्या तिजोरीवर ५३५ कोटींचा बोजा पडणार आहे. मात्र, त्याचा फायदा हा ४६ लाख दुग्धव्यवसाय करणाऱ्या कुटुंबांना होणार आहे, असेही राजू शेट्टी यांनी सांगितले.

एका बाजूला देशात दूध पावडर पडून असताना, केंद्र सरकारने परदेशातून दहा हजार टन दूध पावडर तसेच पाच लाख टन मका आयातीचा निर्णय २३ जून रोजी घेतला आहे. हा निर्णय म्हणजे दुष्काळात तेरावा महिना असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!