स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा आरोप : संचारबंदी मागे घेण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
टीम : ईगल आय मीडिया
सोलापूर जिल्ह्यामध्ये 13 तारखेपासून लागणाऱ्या लाॅकडाऊन संदर्भात पालकमंत्र्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी शी चर्चा करूनच निर्णय घेतलेला आहे. पंढरपूरचे लोकप्रतिनिधी व्यापा-यांना भेटून त्यांची सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. लाॅकडाऊन लावणार आहेत हे माहित असताना त्यावेळी विरोध केला नाही. आणि लाॅकडाऊन लागल्यानंतर व्यापाऱ्याना भेटून दुटप्पी भूमिका घेत आहेत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी केली.
पंढरपूर शहर आणि तालुक्यात 13 ऑगस्ट पासून संचारबंदी लागू करण्यात येत आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या या निर्णयाच्या विरोधात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन संचारबंदी मागे घेण्याची मागणी केली. त्यानंतर बोलताना सचिन पाटील यांनी पंढरपूर येथे लोकप्रतिनिधी यांनी व्यापाऱ्यांना भेटून केलेल्या प्रदर्शनावर टीका केली.
यासंदर्भात अधिक बोलताना पाटील म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, पूर्ण तालुका न बंद करता ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे तो भागच बंद करावा अशी चर्चा झाली असून जिल्हाधिकारी यानी पालकमंत्री यांच्यासोबत चर्चा करून आणखी न्यानो प्लॅनिंग करता येते का असा प्रयत्न करू, असा शब्द दिला आहे, असेही सचिन पाटील यांनी सांगितले.
यावेळी स्वाभिमानी युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, सचिन पाटील, सचिन आटकळे उपस्थित होते