कोरोनामुळे स्वातंत्र्य दिनास आला साधेपना
पंढरपूर : ईगल आय मीडिया
दरवर्षी प्रमाणे ना ‘भारत माता की जय’ चा नारा आज ऐकू आला ना, उत्साहाने भारलेले विद्यार्थी दिसले, ना प्रभात फेरी निघाली, ना देशप्रेमाची भाषणे रंगली, ना कवायत, ना नानाविध उपक्रम! असा कोणताच प्रेरणादाई कार्यक्रम न होता केवळ ध्वजारोहण करण्याची औपचारिकता पूर्ण करत आजचा स्वातंत्र्यदिन संपन्न झाला.
स्वातंत्र्यदिनी गावा-गावामधून देशप्रेमाच्या उत्साहावर कोरोनाचे संकट गडद झाल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळाले. स्वातंत्र्यदिन म्हटले विद्यार्थ्यांच्या आनंद आणि उत्साहाला उधाण आलेले असते. पण आजचा स्वातंत्र्य दिन मुलांचे ‘स्वातंत्र्य’च हिरावून घेत त्यांना घरातच स्थानबद्ध करणारा ठरला.
गेल्या तीन दिवसापासून तालुक्यात पावसाळी वातावरण असून आजच्या स्वातंत्र्यदिनीही सूर्याने दर्शन दिलेच नाही. शाळांवर ध्वजारोहण करताना कोरोनासंबंधित खबरदारीचे सर्व नियम पाळून शिक्षक आणि शाळाव्यवस्थापन समिती यांनी दहा जणांच्याच उपस्थितीत ध्वजारोहण करावे व याप्रसंगी विद्यार्थ्यांना बोलावू नये अशा प्रशासनाच्या सुचना होत्या. भरीस भर म्हनून सकाळपासून आलेल्या संततधार पावसामुळे नागरिकांना निसर्गानेच घरात ‘कॉरंटाइन’ करुन टाकले होते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांशिवाय आणि कोणत्याही सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रमांशिवाय आजचा स्वातंत्र्यदिन हा भारतीय इतिहासातील पहिला स्वातंत्र्यदिन ठरला. पण अशाही परिस्थितीत सर्वच शासकीय कार्यालये, ग्रामपंचायती, नगरपालिका, विविध सामाजिक संस्था, आदी ठिकाणी कोरोनाचे नियम पाळून संततधार पावसामध्ये ध्वजारोहण करण्यात आले. काही नागरिकांनी तर शाळा, कॉलेजमध्ये जाता येत नसल्याने आपल्या पाल्यांसह कुटुंबासमवेत घरावर राष्ट्रध्वज फडकावून स्वातंत्र्यदिन साजरा केल्याचेही दिसून आले.