उत्तम करिअर घडविणाऱ्या क्षेत्रात आवड निर्माण करावी : “डॉ.रोंगे

फेसबुक लाईव्ह मार्गदर्शन सत्रात 46 हजार विद्यार्थीी


पंढरपूर : ईगल आय मीडिया

‘विद्यार्थ्यांनी करिअर करताना आपली आवड-निवड बाजूला ठेवून ज्या क्षेत्रामध्ये उत्तम करिअर घडविता येऊ शकते त्या क्षेत्रात आवड निर्माण करण्याची गरज आहे. भविष्य उत्तम आहे पण आवड नाही, अशा परिस्थितीत आपल्याला मानसिकता व आवड बदलावी लागते. करिअर करताना पारंपारिक अभ्यासक्रमात कमी संधी असतात तर व्यावसायिक शिक्षणात करिअर करण्याच्या संधी अधिक प्रमाणात असतात. शिक्षण घेण्यासाठी शासनाने शैक्षणिक कर्जाची सोय केलेली असते याची बऱ्याचदा आपल्याला माहिती नसते तरी त्याबद्दलही विद्यार्थी व पालकांनी माहिती घ्यावी.’ असे प्रतिपादन श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूरचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी केले.


स्वेरीच्या वतीने ‘बारावीनंतर पुढे काय? या महत्वाच्या विषयावर फेसबुक लाईव्हद्वारे डॉ. रोंगे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. प्रास्ताविकात प्रा. यशपाल खेडकर यांनी स्वेरीची व डॉ. रोंगे सरांची ओळख करून देत मिळालेली मानांकने, संशोधने, कमवा व शिका योजना आदी बाबत सविस्तर माहिती दिली. तसेच डॉ. रोंगे सरांची खर्डीपासून ते पीएच.डी. पर्यंतची शैक्षणिक वाटचाल सांगून त्यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेली संशोधने व वर्तमान परिस्थितीची माहिती दिली.

पुढे बोलताना शिक्षणतज्ञ डॉ. रोंगे म्हणाले की, ‘शिक्षण क्षेत्रात प्रामुख्याने पारंपारिक व व्यावसायिक शिक्षण असे दोन प्रकारचे शिक्षण असून पारंपारिक अभ्यासक्रमात आर्ट्स, कॉमर्स व सायन्स या तीन शाखा पर्याय म्हणून निवडल्या जातात तर व्यावसायिक शिक्षणामध्ये इंजिनिअरिंग, मेडिकल, सीए, सीएस, आर्किटेक्चर इ. पर्याय उपलब्ध आहेत. पारंपरिक शिक्षणाच्या आधारे स्पर्धा परीक्षा देवून देखील यश खेचून आणता येते परंतु त्यात जागांची संख्या कमी असते आणि स्पर्धक खूप असतात. इंजिनिअरिंगकडे पाहिल्यास प्रवेश क्षमता, शैक्षणिक पात्रता आणि आता त्यात नव्याने झालेले बदल यामुळे व्यावसायिक शिक्षण सोयीचे झालेले आहे.’ असे सांगून डॉ. रोंगे यांनी इंजिनिअरिंग कॉलेज निवडताना विद्यार्थी आणि पालकांनी ‘नेमके काय पहावे आणि काय पाहू नये ?’ हे सांगताना त्यांनी ‘फसव्या जाहिराती पाहू नयेत, जाहिरातींमधील सत्यता पडताळून पहावी, कोणते विद्यापीठ आहे याला महत्त्व नाही त्याचबरोबर कॉलेजची फी पाहू नये’ असे सांगितले.

‘शैक्षणिक कर्ज’ मिळवण्यासाठी मार्जिन मनी, थकीत बिल, नातेवाईकांचे थकीत बिल पाहिले जात नाही, जमीन किती आहे हे पहिले जात नाही. शिक्षण शुल्क, वसतिगृह, पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य यासाठी बँक शैक्षणिक कर्ज देत असते.’ असे सांगून कोविड-१९ मुळे सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी. असे सांगून शासनाच्या परिपत्रकानुसार प्रवेश प्रक्रियेमध्ये कुठलाही विलंब होत नसेल तर लवकरच महाविद्यालये नियमित सुरू होतील. हे देखील स्पष्ट केले.

Leave a Reply

error: Content is protected !!