चक्री वादळ : 2 जहाजे भरकटली ; त्यावर 410 जण अडकले

राज्यात 6 जनांचा मृत्यू : मुंबईवर अजूनही वादळाचे संकट

टीम : ईगल आय मीडिया

राज्य प्रशासन, महापालिका प्रशासन आणि एनडीआरएफ या चक्रीवादळाला तोंड देत असतानाच मुंबईजवळच्या समुद्रात दोन मोठी जहाजं भरकटल्याचे वृत्त आहे. यांपैकी एका जहाजावर २७३ जण, तर दुसऱ्या जहाजावर १३७ जण, असे एकूण ४१० जण अडकले आहेत. भरकटलेल्या या जहाजांच्या मदतीसाठी आयएनएस कोच्ची आणि आयएनएस कोलकाता या युद्धनौका पाठवण्यात आल्या आहेत. ही माहिती नौदलाच्या प्रवक्त्याने दिली आहे. दरम्यान, चक्रीवादळामुळे राज्यभरात झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये आज दिवसभरात 6 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी आहेत. तसेच राज्यात 2 हजार 542 घरांची अंशतः तर 6 हजार घरांची पूर्ण पडझड झाली आहे.

तौक्ते चक्रिवादळात एक बोट मुंबईजवळ असलेल्या बॉम्बे हायच्या समु्द्रात तेलाचे उत्खनन करण्यात काम करत होती. मात्र बोट वादळात सापडल्याने ती भरकटल्याची माहिती मिळत आहे. या बोटीवर एकूण २७३ जण आहेत. या बोटीने नांगर टाकलेला नाही. यामुळे ती वादळ ज्या दिशेने जात होते त्या दिशेला वाहत गेल्याचे समजते. वादळाचा वेग मोठा असल्याचे ही भरकटलेली बोट समुद्रात असलेल्या इतर बोटींना धडकल्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे. तसेच बॉम्बे हाय या तेलाच्या प्रकल्पाला देखील ही बोट धकडू शकते अशीही भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईत कालपासूनच तौक्ते चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. आज पहाटेपासूनच प्रचंड वारा आणि त्याचबरोबर तुफान पाऊस सुरू झाल्याने अवघ्या काही तासातच मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं. ढगाळ वातावरण आणि पावसाचे पाणी भरू लागल्याने लोकल सेवा ठप्प केली. वादळामुळे विमान सेवाही बंद ठेवण्यात आली आहे. तसेच सकाळपासून रौद्ररुप धारण केलेल्या वादळामुळे राज्यात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी आहेत.

मुंबईवरील वादळाचा धोका अजून टळलेला नसल्याने मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.
मुंबईत आज ताशी 114 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी घरांची आणि झाडांची पडझड झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर आणि सखल भागात पाणी साचले आहे. कोणताही अनर्थ ओढवू नये म्हणून मुंबईत एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे. राज्यभरात एकूण 12 टीम तैनात आहेत.

मुंबईत 11 तासांसाठी विमान सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच सकाळी काही फ्लाईटस डायव्हर्ट करण्यात आले होते. त्याशिवाय मोनोरेल सेवाही बंद ठेवण्यात आली आहे. तर, अनेक ठिकाणी रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवाही विस्कळीत झाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!