गुरसाळे – कौठाळी पुलाचे भूमिपूजन संपन्न
पंढरपूर – ईगल आय मीडिया
पंढरपूर शहराला भीमा नदीच्या पैल तिराशी जोडणारे सध्या 2 मोठे पूल असले तरीही आता त्यापेक्षा ही मोठा तिसरा पूल उभा राहतो आहे. या 4 पदरी नवीन पुलामुळे महापूर आल्यानंतर ही पंढरीचा इतर भागाशी संपर्क कायम राहण्यास मदत होणार आहे. आज ( गुरुवार, दि.31 डिसेंबर ) या पुलाचे भूमिपूजन प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते करण्यात आले.
या पुलाची रुंदी 4 पदरी ( 32 मीटर्स ) तर लांबी 525 मीटर्स इतकी आहे. हा पूल रुंदीने आणि उंचीनेही यापूर्वी अस्तित्वात असलेल्या पुलांच्या तुलनेत उंच आणि लांब आहे. महापूर आला तरीही या पुलामुळे वाहतूक विस्कळीत होणार नाही. आज गुरसाळे येथे प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते या नवीन पुलाच्या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले आहे. या पुलामुळे तालुक्यातील खूप मोठ्या लोकसंख्येला लाभ होणार आहे.
पंढरपूर तालुक्यातुन वाहणाऱ्या भीमा नदीवर सध्या 4 पूल आहेत. त्यापैकी 3 पूल पंढरपूर येथे आहेत तर एक व्होळे-कौठाळी दरम्यान आहे. मात्र उद्दे चारही पूलांची उंची कमी असल्याने भीमा नदीला पूर आला की हे पूल पाण्याखाली जातात आणि पंढरीचा सोलापूर, अहमदनगर सह मराठवाडा, विदर्भातील संपर्क तुटतो.
या पार्श्वभूमीवर अधिक उंच पुलाची मागणी होत होती. दरम्यान मोहोळ – पंढरपूर – पुणे – आळंदी हा राष्ट्रीय महामार्ग क्र.965 याच भागातून गेला असून या महामार्गासाठी नविन पुलाची गरज निर्माण झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग बायपास करिता गुरसाळे – कौठाळी या दरम्यान हा नवीन पूल उभा राहतो आहे.