करकंब येथे दोन सख्या भावांसह तिघांचा शेत तळ्यात बुडून मृत्यू

करकंब : ईगल आय न्यूज

करकंब येथील शेत तळ्यात बुडून तीन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना शनिवारी घडली आहे. यामध्ये दोन सख्या भावांचा समावेश असून या अपघातामुळे करकंब परिसरात शोककळा पसरली आहे. मनोज अंकुश पवार (वय 11 वर्षे),गणेश नितीन मुरकुटे(वय 7 वर्षे),हर्षवर्धन नितीन मुरकुटे(वय 9 वर्षे) अशी त्या मुलांची नावे आहेत. शनिवार दि. १३ रोजी करकंब ( ता पंढरपूर) येथील मोडनिंब रोडलगत असलेल्या परदेशी यांच्या शेतीच्या पाण्याच्या तळ्यात मध्ये पडून या तीन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सायंकाळच्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे.

गावातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक मध्ये शिकणारे हर्षवर्धन मुरकुटे आणि गणेश मुरकुटे तसेच रामभाऊ जोशी विद्यालयात शिकत असलेला मनोज अंकुश पवार यांची कुटुंबे शेजारी – शेजारी राहत आहेत. या दोन्ही मुलांचे पालक मजुरी करून उदरनिर्वाह करीत आहेत. शनिवारी हे पालक नेहमी प्रमाणे कामावर गेले होते. परत आल्यानंतर त्यांना मुळे दिसेनाशी झाली. त्यामुळे मुलांचा गल्लीत, गावात शोध घेण्यास सुरुवात केली. सायंकाळी परदेशी यांच्या शेत तळ्यात ही तीन लहान मुले पडल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे घरापासून सुमारे एक किमी लांब ही मुले आलीच कशी असा सवाल उपस्थित केला जात आहे.


शेत तळ्यात तीन लहान मुले पडल्याची घटना करकंब व परिसरात वाऱ्यासारखी पसरली होती. या घटनेची माहिती मिळताच करकंब पोलिसांनी तात्काळ सदर ठिकाणी धाव घेऊन या तलावातून मनोज अंकुश पवार, गणेश नितीन मुरकुटे, हर्षवर्धन नितीन मुरकुटे या मुलांचे मृतदेह बाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल केले. या दुर्दैवी घटनेमुळे करकंब व परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!