देव दर्शनास निघालेले तीन भाविक ठार

सोलापूर जवळ भीषण अपघात

सोलापूर : eagle eye news

तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात होऊन तिघांनी जागीच जीव गमावल्याची हृदयद्रावक घटना सोलापुर – तुळजापूर मार्गावर तामलवाडी येथे घडली आहे. भरधाव वेगात असलेल्या बोलेरोचे टायर फुटून हा थरारक अपघात घडला. या अपघातात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामुळे सध्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सोलापूर – तुळजापूर मार्गावर मंगळवारी सकाळी बोलेरो वाहनाचे टायर फुटून वाहन पलटी होऊन हा भीषण अपघात झाला. यामध्ये तिघांनी जीव गमावला तर पाच भाविक गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात घडला आहे. सोलापुरातील शासकीय रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तीन मृतदेहांवर शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

निखिल रामदास सानप (वय २१ वर्ष, रा. चास, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक), अनिकेत बाळासाहेब भाबड (वय २२ वर्ष, रा. चास, तालुका सिन्नर, जि. नाशिक), अथर्व शशिकांत खैरनार (वय २२ वर्ष, रा. चास, तालुका सिन्नर, जि. नाशिक) अशी मृतांची नावे आहेत. गणेश नामदेव खैरनार (वय ३२), पंकज रवींद्र खैरनार (वय ३०), जीवन सुदीप ढाकणे (वय २५), तुषार बिडकर (वय २२), दीपक बिडकर (वय २४, रा. चास, ता. सिन्नर जि. नाशिक अशी जखमी झालेल्यांची नावं आहेत.

यातील जखमी आणि मृत झालेले तरुण मंगळवारी सकाळी तुळजापूरला (एमएच १५ ई एक्स ३२११) या बोलेरो वाहनातून सोलापूर ते तुळजापूरकडे देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. सोलापूर उस्मानाबादच्या सीमेवर वाहन पलटी होऊन हा अपघात झाला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!