ट्रकची 6 वाहनांना धडक : 3 जण ठार

शिरवळ ( ता .खंडाळा ) येथे सातारा – पुणे महामार्गावर अपघात

टीम : ईगल आय मीडिया

सातारा : पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर शिरवळ (ता.खंडाळा ) जवळ धनगरवाडी येथे सहा वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. एका ट्रकने धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. यावेळी ट्रकने उडवलेल्या वॅगनार कारमधील 3 जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं उघडकीस आलं. या घटनेमुळे परिसरात प्रचंड गोंधळ बघायला मिळाला. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

पुणे-बंगळुरु महामार्गावर गाड्या या साताऱ्याहून पुण्याच्या दिशेला जात होत्या. यावेळी एका भरधाव ट्रकने सहा गाड्यांना धडक दिली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला. या अपघातात वॅगनार कार चक्काचूर झाली असून इतर गाड्यांचंदेखील प्रचंड नुकसान झालं आहे. तसेच ट्रकने दुधाचा टँकर, मालट्रक, स्कॉर्पिओ आणि आणखी एक वाहन अशा पाच वाहनांना धडक दिल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर काही वेळासाठी पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती.

महामार्गाने जाणारे इतर प्रवासी आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. तातडीने खंडाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!