कोरोना लपवला : एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू

सांगली जिल्ह्यातील दुःखद घटना

टीम : ईगल आय मीडिया

करोना झाल्याची माहिती लपवलेल्या नातेवाईकांना भेटल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना टाकळी ( ता.मिरज,जि. सांगली ) येथे घडली. एकाच कुटुंबातील बाहुबली पाटील, त्यांच्या पत्नी आणि चुलता अशा तिघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत असतानाच करोनाची माहिती लपवण्याबद्दल संतापही व्यक्त होत आहे.

मिरज तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी असलेले बाहुबली पाटील यांच्या एका नातेवाईकाची तब्येत बिघडली होती. या नातेवाईकाला करोनाची लागण झाली होती. ही माहिती मिळताच बाहुबली पाटील यांच्या आई, आजारी नातेवाईकाला पाहण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या. नातेवाईकाला करोनाची लागण झाल्याची माहिती बाहुबली पाटील यांच्या आईपासून लपवून ठेवण्यात आली. नातेवाईकाला पाहून घरी परतलेल्या बाहुबली यांच्या आईला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

बाहुबली पाटील यांच्या आईला करोनाची लागण झाल्यानंतर त्यांचा संसर्ग बाहुबली पाटील यांच्या पत्नी, त्यांचे दोन चुलते आणि चुलतभावांना झाला. या संपूर्ण कुटुंबालाच करोनाची लागण झाली. सुरुवातीला या सर्वांना करोनाची सौम्य लक्षणे दिसत होती. म्हणूनच या संपूर्ण कुटुंबाने घरीच उपचार सुरू ठेवले. मात्र काही दिवसातच बाहुबली पाटील यांची तब्येत खालावत गेली. त्यानंतर पाटील कुटुंबातील सर्वच बाधितांना कोल्हापुरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्रथम पाटील कुटुंबातील बाहुबली पाटील यांच्या आईची प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू ओढवला, तर त्यानंतर काही दिवसांनी बाहुबली यांच्या चुलत्याचे निधन झाले. नंतर बाहुबली पाटील यांचेही करोनाने निधन झाले. पाटील कुटुंबातील तिघांचा मृत्यू ओढवल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून भितीचे वातावरणही पसरले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!