तीन आत्महत्याने सांगली जिल्ह्यात खळबळ
टीम : ईगल आय मीडिया
मणेराजुरी (ता. तासगाव, जि. सांगली ) येथील शेकोबा डोंगरावर तिघां तरुणांनी विषारी द्रव पिऊन आत्महत्या केली. यामध्ये 2 युवती आणि एका युवकाचा समावेश आहे. प्रेम प्रकरणातून ही घटना झाली असावी असा संशय पोलिसांना आहे. हरिश हणमंत जमदाडे (वय 22, रा. मणेराजुरी), प्रणाली उद्धव पाटील (वय 19, रा. जायगव्हाण, ता. कवठेमहांकाळ, सध्या रा. मणेराजुरी) व शिवानी गुंडा घाडगे (वय 24, रा. हतीद, ता. सांगोला, जि. सोलापूर) अशी आत्महत्या केलेल्या तिघांची नावे आहेत.या प्रकरणाची तासगाव पोलिसात नोंद झाली आहे.
तासगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मणेराजुरी गावापासून उत्तरेला चार किलोमीटर अंतरावर शेकोबा डोंगर आहे. या डोंगरावर हे तिघेजण बुधवारी रात्री उशिरा गेले असावेत. त्या ठिकाणी त्यांनी द्राक्षबागांवर फवारले जाणारे विषारी द्रव पिऊन आत्महत्या केली असावी, अशी शक्यता आहे. गुरुवारी सकाळी भाविक येथील शेख फरद्दीनबाबा यांच्या दर्शनाला गेले होते. तेव्हा ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी ही माहिती गावातील लोकांना दिली. घटनास्थळी पोलिसपाटील दीपक तेली गेले. त्यांनी या घटनेची माहिती तासगाव पोलिसांना दिली.
तीनही मृतदेहांचे शवविच्छेदन येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.रुग्णालयाने तिघांचा व्हिसेरा राखून ठेवला आहे. पण त्यांच्या शरीरात विषारी द्रव्याचा अंश आढळून आला असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. शवविच्छेदनांनतर मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देणार आहे. रात्री त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सकाळी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी तीनही मृतदेह विखरून पडले होते.त्यांच्याशेजारीच प्लॅस्टिक पिशवीत दोन हार ,गुच्छ आणि चॉकलेट आढळून आले. घटनास्थळी तिघांचेही मोबाईल पडलेले होते. कोणाच्याही शरीरावर मारहाणीच्या वगैरे खुणा दिसून येत नसल्याने त्या आत्महत्याच असल्याचे तपासाधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक शेळके यांनी सांगितले.
या तिघांपैकी हरिश हा नेहमी कामानिमित्त बाहेरगावी असतो.तो आणि प्रणाली यांची घरे शेजारी आहेत.प्रणाली आईबरोबEर मामाच्या गावात राहते.ती रात्री घरातून कधी निघून गेली होती याची तिच्या आईला माहीत नव्हती, असे पोलिसांनी सांगितले.