टिळक स्मारक मैदानात सभा घेतलेला उमेदवार जिंकत नाही

मैदानाची अपयशी परंपरा कायम राहणार की खंडित होणार ?

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकिच्या प्रचारार्थ भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांची प्रचार सभा शहरातील मध्यवर्ती टिळक स्मारक मैदानात पार पडली. मात्र आता त्या मैदानाची निवडणूक प्रचार सभा आणि निकालाची परंपरा याची चर्चा सुरू झाली आहे. कारण आजवर टिळक स्मारक मैदानात सभा घेतलेला उमेदवार निवडून आलेला नाही. आता ही परंपरा कायम राहते की अवताडे ती परंपरा खंडित करतात हे 2 मे रोजी स्पष्ट होणार आहे.

विधानसभा पोटनिवडणूक प्रचार आता 2 दिवस राहिला आहे. त्यामुळे राजकीय धुळवड जोरदार रंगली आहे. सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर मध्ये भाजप उमेदवार समाधान अवताडे यांच्यासाठी टिळक स्मारक पटांगणात प्रचार सभा घेतली. सभेवेळी मोठ्या प्रमाणात वाढली वारे आणि धुळीचे लोट उठल्यामुळे सभा अपेक्षेप्रमाणे रंगली नाही. मैदान मोठे असले तरी सुरक्षेसाठी सोडलेला भला मोठा d झोन आणि कॉटन बझार यामुळे 25 टक्के एवढेच मैदान सभेसाठी उपलब्ध झाले होते. राज्यातील भाजपचा सर्वात मोठा नेता सभेला आलेला असताना जमलेली गर्दी अपेक्षेहुन खूप कमी होती असेही बोलले जाऊ लागले आहे.

दरम्यान, टिळक स्मारक मैदानाच्या निवडणूक प्रचार सभा आणि निकालाची परंपरा याची चर्चाही काल पासून पुन्हा रंगली आहे. कारण आजवर टिळक स्मारक मैदानात प्रचार सभा घेतलेला उमेदवार निवडून आलेला नाही, अशी या मैदानाची परंपरा आहे. अगदी 2004 साली तत्कालीन शिवसेना उमेदवार भारत भालके यांनाही या मैदानात सभा घेततल्यानंतर पराभूत व्हावे लागले होते. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची जंगी सभा त्यावेळी झाली होती, संपूर्ण मैदान खचाखच भरले होते, तरीही भारत भालके यांना पराभूत व्हावे लागले होते.

2004 सालीच या मैदानावर भाजपचे लोकसभा उमेदवार नागनाथ क्षीरसागर यांची प्रचार सभा झाली होती. तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन यांच्यामुळे सभेला मोठी गर्दी होऊनही क्षीरसागर यांचा पराभव झाला होता. 2009 सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार ऍड. शरद बनसोडे यांच्यासाठी अभिनेत्री हेमा मालिनी यांची प्रचार सभा याच मैदानावर झाली होती. तेव्हा सुद्धा ऍड.बनसोडे निवडणूक हरले होते.

2014 साली काँग्रेस आघाडी सरकार विरोधात जनतेच्या मनात अतिशय रोष होता. त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, महायुती चे उमेदवार म्हणून प्रशांत परिचारक यांच्यासाठी याच टिळक स्मारक मैदानावर अतिशय भव्य प्रचार सभा संपन्न झाली होती. त्या निवडणुकीत ही प्रशांत परिचारक यांचा पराभव झाला होता. विशेष म्हणजे त्या निवडणुकीत पंढरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऐतिहासिक सभा झाली होती, तरीसुद्धा प्रशांत परिचारक यांना पराभूत व्हावे लागले होते. एकही मोठी सभा न घेता भारत भालके यांनी त्यांना पराभूत केले होते.

या मैदानाची ही अपयशी परंपरा लक्षात घेता सोमवारी अवताडे यांची टिळक स्मारक मैदानात झालेली सभा त्यांच्यासाठी यशदायी ठरते की परंपरा कायम राहते हे 2 मे रोजी समजणार आहे. सध्या तरी टिळक स्मारक मैदान आणि निवडणुकीतील अपयश याची चर्चा रंगली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!