अहो आश्चर्यम : जुनमध्येच तिसंगी तलावात पाणी

नीरा उजवा कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात

पंढरपूर : ईगल आय मीडिया
जुलै महिना संपत आला तरीही तलाव कोरडा आहे, आणि नीरा उजवा कालव्यातून तलावात पाणी सोडावे, तो १००टक्के भरून घ्यावा अशी मागणी करीत आंदोलनाचे इशारे देणाऱ्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना यंदा मात्र सुखद धक्का बसला आहे. कोणतीही मागणी न करताच तिसंगी तलावात नीरा उजवा कालव्याचे पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.
तिसंगी तलाव हा पंढरपूर तालुक्याच्या भागातील १० गावांसाठी महत्वाचा जलस्रोत आहे. नीरा उजवा कालव्यातून ओव्हर फ्लो पाणी सोडून सुमारे १ टीएमसी क्षमतेचा हा तलाव दरवर्षी भरून घेतला जातो. गेल्या १५ ते २० वर्षात तलावाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दरवर्षी तलावात पाणी सोडण्यासाठी आणि नंतर तलावातून शेतीला पाणी सोडा म्हणून आंदोलने करावी लागली आहेत. त्यामुळे तिसंगी तलाव आणि शेतकरी- अधिकारी यांच्यात तणाव हे समीकरण बनले आहे .
या पार्श्वभूमीवर यंदा मात्र लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना फारसे प्रयास न करता पाण्याच्या ३ पाळ्या अगदी वेळेवर मिळाल्या . तीन पाळ्या मिळाल्यानंतरही तलावात 7 फूट पाणी शिल्लक होते. जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात पाऊस आल्याने नीरा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रातून पाण्यासाठी शेतकऱ्याची मागणी झाली नाही. दरम्यान, नीरेच्या खोऱ्यातील वीर, भाटघर , नीरा देवघर धरणांतून २३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, त्यामुळे विर धरणामधून उजवा आणि डावा या दोन्हीही कालव्यांस पाणी सोडले जात आहे. सध्या हेच पाणी तिसंगी तलावात सोडण्यात येत आहे.
वास्तविक आजवर जून-जुलैमध्ये नीरा उजवा कालवा लाभक्षेत्रात पावसाअभावी शेतकऱ्यांची पाण्याची मागणी असते म्हणून तिसंगी तलावात पाणी सोडता येत नाही. यंदा मात्र नीरा उजवा लाभक्षेत्रातून मागणी नाही आणि धरणांत पाणी ठेवता येत नाही हे पाहता एन. आर. बी. सी.ने मागणी करण्यापूर्वीच तिसंगी तलावात पाणी सोडले आहे.
रविवारपासून २५० क्युसेक्सने पाणी सोडले जात आहे. याच प्रमाणात पाणी सुरु राहिले तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच तिसंगी तलाव शंभर टक्के भरला जाईल. त्यानंतर मात्र परतीच्या पावसाचे ओव्हर फ्लो पाणी नदीला आणि मागणी नसली तरीही कालव्यास सोडून द्यावे लागेल असे चित्र निर्माण झाले आहे. सध्या तरी जुनमध्येच तिसंगी तलावात पाणी सोडल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी आश्यर्य चकित झाला आहे

Leave a Reply

error: Content is protected !!