भीमेच्या खोऱ्यात धुवांधार पाऊस : 8 धरणांवर विक्रमी पावसाची नोंद
टीम : ईगल आय मीडिया
हवामान विभागाने अंदाज वर्तवल्यानुसार मागील दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात विशेषतः मुळा -मुठा नदीच्या खोऱ्यात जोरदार पर्जन्य वृष्टी सुरू आहे. काल बुधवारच्या 24 तासांत मुळा मुठा खोऱ्यात अक्षरशः पावसाने धुमाकूळ घातला असून 3 धरणांवर 200 मिमी हुन अधिक पाऊस झाला आहे तर 8 धरणांवर 100 मिमी हुन जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे भीमा नदीच्या पात्रात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग दौंड येथे 9 हजार क्यूसेक्स पेक्षा अधिक झाला आहे. यामुळे उजनी धरण उद्या सकाळपर्यंत प्लस पातळीवर येणार आहे.
मागील 24 तासात मुळा मुठा नदीच्या खोऱ्यात वरसगाव धरण 153 मिमी, पानशेत 155 मिमी, पवना 232 मिमी, टेमघर 250 मिमी तर मुळशी 295 मिलिमीटर, आंध्रा 79 मिमी, कासारसाई 60 मिमी. तर भीमा नदीच्या खोऱ्यात वडीवले धरण 198 मिमी, कलमोडी 94 मिमी तर भामा आसखेड 53 मिलिमीटर, डिंभे 129 मिमी, माणिकडोह 63, चासकमान 58 मिमी असा पाऊस झाला आहे. तर नीरा नदीच्या खोऱ्यात ही अतिवृष्टी झाली असून गुंजवणी धरणावर115 मिमी, नीरा देवघर धरणावर 249 मिमी एवढा पाऊस नोंदवला आहे.
मागील दोन दिवसांपासून मुळा – मुठा नदीच्या खोऱ्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे भीमा नदीच्या विसर्गात वाढ झाली असून त्यामुळेच दोन दिवसांत उजनी धरण मायनस मधून प्लस पातळीला वेगाने येत आहे. काल दिवसभर 8 हजार क्यूसेक्स पेक्षा अधिक आवक असल्याने उजनी धरण सुमारे 2 टक्के वधारले आहे.तर आज धरणात येणारा विसर्ग 9 हजार क्यूसेक्स हुन अधिक असल्याने उजनी आज रात्री पर्यंत प्लस मध्ये येण्याची अपेक्षा आहे.