पंढरपूर च्या बाजारात टोमॅटोच्या 3 कॅरेट ची किंमत 15 रुपये
पंढरपूर : ईगल आय मीडिया
कोरोनामुळे एक बाजूला मार्केट बंद असताना दुसऱ्या बाजूला शेतमालाचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळलेले आहेत. आज पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या 3 कॅरेट ना केवळ 15 रुपये भाव मिळाला. म्हणजे सुमारे 20 किलोचा एक कॅरेट 5 रुपयेना विकला गेला. 25 पैसे एका किलोस भाव मिळल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो काढणी ही परवडत नाही म्हणून शेतातच सोडून दिला आहे तर अनेकांनी रान मोकळे करायचे म्हणून टोमॅटो काढून बांधावर, रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याचे दिसून येते.
दरम्यान, या संदर्भात बाजार समितीचे सचिव कुमार घोडके यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, कोरोना निर्बंधामुळे राज्यातील काही मोठी मार्केटस बंद आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा माल स्थानिक मार्केटला क्षमतेहून अधिक आला. त्यामुळे मालाचे भाव घसरले आहेत. शिवाय बदलत्या वातावरणात शेतमालाची प्रतवारी घसरली आहे, त्यामुळे शेतमालाचे भाव घसरले आहेत.
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिलावात आज टोमॅटोच्या दराची घसरण मोठ्या प्रमाणात दिसून आली. पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने टोमॅटो लवकर पिकू लागला आहे. त्यामुळे टोमॅटोची आवक मागील 8 दिवसांपासून वाढली आहे. त्यामुळे गेल्या 8 दिवसांत पंढरपूर च्या बाजारात टोमॅटो कॅरेटचा भाव 50 ते 150 रुपये या प्रमाणात चालू आहे. आज गुरुवारी सुमारे 250 कॅरेट ची आवक झाल्यानंतर टोमॅटोच्या दरात आणखीन घसरण झाली असून सरासरी 75 रुपये प्रति कॅरेट दराने टोमॅटो विकला गेला.
एका शेतकऱ्याच्या 3 कॅरेट ना तर केवळ 15 रुपये दर मिळाला. त्यामुळे तो शेतकरीच नाही तर व्यापारी सुद्धा निराश झाल्याचे दिसून आले. लिलाव बोलणाऱ्या व्यापाऱ्याने घसरती बोली पाहून शेतकऱ्याने जगायचे कसे ? तो आत्महत्या का करणार नाही ? अशी व्यथा बोलून दाखवली. त्या व्यापाऱ्यांचा आणि त्या लिलाव बोलीचा व्हीडिओ आज जिल्ह्यातील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत आहे.